काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडीया’ शब्द वापरला तो काही अपशब्द नाही, शिवी नाही, असंसदीय शब्द नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून दुर्गा असल्याचे दाखवून द्यावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सार्वजनिक जिवनात वावरताना प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाजूला एक गुंड प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला गप्प बसवतो, अशावेळी उपमुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाहीत व उपमुख्यमंत्री पत्रकारांचे प्रश्नही घेत नाहीत, अशावेळी हाताची घडी व तोंडावर बोट ठेवले, म्हणून गुंगी गुडिया हा शब्द वापरला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणत्याच विषयावर बोलत नाहीत, अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले, त्याच्या चौकशीवर त्या बोलत नाहीत, गुन्हा दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत, त्यांच्याकडील अर्थखाते भाजपाने काढून घेतले त्याबद्दल त्या बोलत नाहीत. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या अधिकारावर गदा आणत आहे, त्यावर त्या बोलत नाहीत. अशा पद्धतीने गप्प बसणे हे सार्वजनिक जीवनात व उपमुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला अशोभनीय आहे. अजित पवार हे कणखर व बाणेदार नेतृत्व होते, त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करणारी व्यक्ती काहीच बोलत नाही म्हणून जे वर्णन केले ते योग्य आहे. व्यक्तीगत आकासापोटी त्यांच्यावर टीका केलेली नाही, असेही सपकाळ म्हणाले. आपल्यावर झालेल्या टीकेला सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे, असेही म्हणाले.
देवेंद्र फडणविसांची गृहविभागावर पकड नाही..
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डायरेक्ट खात्यात पैसे जमा होत असताना भ्रष्टाचार होतोच कसा, राममंदिराच्या दानपेट्यातील दान चोरले, सोनेचादी, पैसे चोरले, तशीच चोरी महाराष्ट्राच्या तिजोरीतून केली आहे, याला गृहमंत्री जबाबदार आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. कर्मचारी असल्याचे भासवून सरकारच्या खात्यातून कोट्यवधी रुपये लाटले हे दुर्दैवी आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर याची पाळंमुळं पोहचलेली आहेत. त्यांच्या विभागात वरपासून खालीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. कर्मचारी असल्याचे भासवून पगार, भत्ते व अनुदान काढले जाते, याचे काय प्रायश्चित करणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे असा जाबही यावेळी विचारला.
सिद्धिविनायक मंदिरातील चोरीची चौकशी करा.
हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरात ज्या पद्धतीने भाविकांनी दिलेल्या देणग्या, अर्पण केलेले सोने चांदी पैसे यांची चोरी करण्यात आली पण ती चोरी लपवण्याचे पाप केले जात आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील दान पेटीवरही असाच दरोडा टाकला आहे त्याची चौकशी करा, राममंदिरातील चोरी लपवण्यासारखे काम करू नका असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
‘जेन झी’ला RSS च्या खऱ्या रुपाची ओळख करुन द्या.
शेवटी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत ‘जेन झी’ व ‘जेन अल्फा’ शी संवाद साधणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशासाठी स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रज बरे आहेत असे सांगून त्यांना साथ देते त्यावर त्यांनी संवाद साधावा. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही ५०-५५ वर्षे राष्ट्रध्वज संघाच्या कार्यालयावर का फडकवला नाही, रा. स्वं संघाची अद्याप नोंदणी का केली नाही न संघाला मिळत असलेल्या देणग्या सार्वजनिक का करत नाहीत यावरही त्यांनी संवाद साधला पाहिजे. चातुर्वर्ण्य, स्त्री-पुरुष असमानता यावरही सरसंघचालक यांनी तरुणाईशी संवाद साधावा म्हणजे संघाचे खरे स्वरुप तरुणाईच्या लक्षात येईल असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya