काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणून टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे गांधी भवनात जावून निदर्शने

ये ‘गुंगी गुडिया नही ये ‘आंधी’ है… हर्षवर्धन सपकाळ हाय हाय… हर्षवर्धन सपकाळ माफी मागा… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील गांधी भवन येथील कॉंग्रेस कार्यालयात घुसून हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध केला.

जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज दुपारी २ वाजता तन्ना हाऊस येथील गांधी भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण आणि दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात जाऊन हे आंदोलन करण्यात आले.

कॉंग्रेसच्या एक्स पेजवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर ट्वीट करण्यात आला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत घुसून हा जाहीर निषेध केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, दक्षिण मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पूजा पवार, पांडुरंग रोडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस आज अप्रत्यक्षपणे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावरील त्याकाळातील टीका योग्य होती असं मानत आहे का? – उमेश पाटील

लोकशाहीत मतभेद असू शकतात, धोरणांवर कठोर टीका होऊ शकते; परंतु महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही…

‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगाद्वारे काँग्रेस स्वतःच्या इतिहासालाच नाकारत आहे का? काँग्रेस आज अप्रत्यक्षपणे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावरील त्याकाळातील टीका योग्य होती असं मानत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावर कॉंग्रेसने अशोभनीय ट्वीट केले आहे. त्याला उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या काळात त्यांच्या विरोधकांकडून अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती. मात्र इंदिरा गांधी यांनी कोणालाही शब्दांनी नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले होते. बांग्लादेश मुक्तिसंग्रामातील नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेमुळे त्या जागतिक स्तरावर प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या गेल्या. त्या काळानंतर त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक विविध राजकीय नेत्यांनीही केले होते याची आठवण उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला करून दिली आहे.

ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळात अन्यायकारक व महिलेचा अवमान करणारी टीका मानले होते, त्याच शब्दप्रयोगाचा वापर आज काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे? याचा अर्थ काँग्रेस आज अप्रत्यक्षपणे हे मान्य करत आहे का? असाही सवाल उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला केला आहे.

हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नाही; तर सार्वजनिक जीवनातील महिलांविषयीच्या राजकीय संस्कृतीचा आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, धोरणांवर कठोर टीका होऊ शकते; परंतु महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही अशा शब्दात उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला खडसावले आहे.

काँग्रेसने संबंधित शब्दप्रयोग मागे घ्यावा आणि सार्वजनिक जीवनात सन्मानपूर्वक राजकीय संवादाची परंपरा जपावी, अशी अपेक्षा उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *