आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत मुलभूत सुविधा मिळत नाहीत, निकृष्ट जेवण मिळते, पाण्याची व्यवस्था नाही. या मुद्द्यांवर विद्यार्थी शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. मुंबईत आलेल्या व काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये विश्रांती घेत असताना मुंबई पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आदिवासी विद्यार्थ्यांवर कारवाई केली. विद्यार्थ्यांची जबरदस्तीने धरपकड करून त्यांचा नाहक छळ करणाऱ्या पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, अशी मागणी ज्येष्ठ नेते व CWC चे सदस्य नसीम खान यांनी केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नसीम खान पुढे म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी मागील काही दिवसांपासून नाशिक ते मुंबई लाँग मार्च करत मुंबईत आले. आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी विद्यार्थ्यांनी मागितली होती पण पोलिसांनी ती अचानक रद्द केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेत्यांशी संपर्क केला व त्यांची राहण्याची व्यवस्था टिळक भवन मध्ये करण्यात आली. लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी मुंबई पोलिसांनी टिळक भवनमध्ये येऊन धरपकड केली. विद्यार्थ्यांबरोबर NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रद्युम यादव, ऑफीस कर्मचारी व विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन ८ ते १० पोलीस स्टेशनमध्ये फिरवले. पोलिसांनी १५-१६ वर्षांच्या विद्यार्थीनींनाही ताब्यात घेऊन त्यांना वाईट वागणूक दिली, त्यांचा छळ केला, पोलीस कारवाईमुळे काही मुली बेशुद्ध पडल्या.पोलिसांच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तिव्र शब्दात निषेध करत आहे.
आपल्या न्याय मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आंदोलनासाठी मुंबई हायकोर्टाने आझाद मैदानाची जागा निर्धारित करून दिली आहे, असे असताना पोलीस परवानगी देत नाहीत. आदिवासी विद्यार्थ्यांनी महिनाभरापूर्वीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची नाशिकमध्ये भेट घेऊन त्यांच्या समस्या व व्यथा मांडल्या होत्या. काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. या विदयार्थ्यंना न्याय मिळपर्यंत त्यांच्या संघर्षाला साथ देऊ, असेही नसीम खान म्हणाले.
टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची विचारपूस केल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने दादर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. टिळक भवनमध्ये बेकायदेशीरपणे घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी केली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सिंगल सेलचे प्रमुख ॲड. रविप्रकाश जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, महाराष्ट्र NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे, मुंबई NSUI चे अध्यक्ष प्रदुम्न्य यादव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, अनंत मोहोड, श्रीरंग बर्गे, प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के यांच्यासह प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Marathi e-Batmya