जयंत पाटील यांची मागणी, डीपीटी लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द तात्काळ रद्द करण्यात यावा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

जयंत पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, मुंबईच्या हाफकिन बायो फार्मास्यूटिकल कॉर्पोरेशनचे लसीकरणात फार मोठे योगदान आहे. डी पी टी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचे उत्पादन करण्याची क्षमता हाफकिनकडे आहे.  ही अत्यंत दुर्मिळ व अमूल्य जैव संपत्ती असून तिचे बाजार मूल्य हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र रिलायन्स लाईफ सायन्स या खाजगी कंपनीने ही सीड स्ट्रेन व्यावसायिक अटींवर विकत घेण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शासन पातळीवर लगेचच विक्री प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसते. एका खाजगी कंपनीच्या मागणीवरून अशी मौल्यवान जैव संपत्तीची विक्री प्रक्रिया सुरू होणे हे अत्यंत चिंताजनक आहे. मी हा गंभीर प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडला होता व सदर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर शासनाकडून मला कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, ज्यांच्या नावाने ही संस्था उभी आहे ते महान शास्त्रज्ञ वाल्देमर हाफकीन यांनी मानवतेच्या सेवेसाठी लसी विकसित केल्या. त्यांनी आपल्या संशोधनावर कोणतेही पेटंट घेतले नाही. कारण वैद्यकीय शोध मानवतेच्या हितासाठी असावेत हा त्यांचा ठाम विश्वास होता. मात्र शासनाने याचा कोणताही विचार न करता ही सीड स्ट्रेन विक्रीची प्रक्रिया सुरू करून त्यांच्या सिध्दांतांची थट्टा उडवली आहे.

शेवटी जयंत पाटील म्हणाले की, या लसीची सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव शासनाने तात्काळ रद्द करावा. तसेच, लसीची सीड स्ट्रेन कोणत्याही खाजगी कंपनीला देण्याऐवजी हाफकिन महामंडळाने स्वतः लसीचे उत्पादन सुरू करावे. यामुळे लस नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत होईल असे मत मांडले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सेवा संकल्प अभियानात राज्यातील सर्व जनतेची आरोग्य तपासणी करा ॲनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी राज्यव्यापी अभियान राबवावे

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसह अॅनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, शालेय विद्यार्थ्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *