इयत्ता १० व इयत्ता १२ वी च्या जुन – जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने ८ जून २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.
जून- जुलै २०२६ परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावीत. या प्रवेशपत्रासाठी कोणतेही शुल्क नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी असावी. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहे, त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होणार आहेत.
तसेच अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एक्स्ट्रा सीट नंबर ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख व इतर दुरूस्त्या असल्यास, विषय किंवा माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही, अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होऊन लेट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या ऑप्शन द्वारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. प्रवेश पत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र देण्यात यावे. तरी या प्रवेशपत्राबाबत या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.
Marathi e-Batmya