नितेश राणे यांचे निर्देश, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान वॉटर टॅक्सी सुरु करण्याबाबत आदेश

गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नितेश राणे शेवटी बोलताना म्हणाले की, नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल,  असेही सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *