राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळवलेल्या महायुतीतील सत्ता स्थापनेच्या अंतर्गत घडामोडीवरील वाद अद्याप संपलेला दिसत नाही. त्यातच निवडणूकीचे संशयातीत निकाल लागून चार-पाच दिवस झाले तरी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार महायुतीतील घटक पक्षांना कोणती खाते देणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसह राजकिय वर्तुळात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सत्ता फॉर्म्युलाच जाहिर करत आज रात्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भादपाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थित नवी दिल्लीत बैठक होऊन त्यास अंतिम स्वरूप देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात महायुतीतील नेत्यांची रात्री बैठक होणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकारी नेत्यांची बैठक होण्याची शक्यता असून या बैठकीतच पुढील निर्णय होणार असल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा मागील वेळेला ठरलेला फॉर्म्युला ठरलेला असल्याचे सांगत आम्ही एकत्रित चर्चा करून पुढे काय करायचं याचा निर्णय घेऊ, तसेच राज्यातील मंत्रिमंडळ कसं असेल याबाबत साधकबाधक चर्चा होईल, त्यातून सत्तास्थापनेबाबत अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. याशिवाय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात खाते वाटप, पालकमंत्री पद, सभापती-उपसभापती यांची निवड एकत्र बसून एकमताने घेतला जाणार आहे. आमच्यात एकवाक्यता असून कोणतेही मतभेद नाहीत. तसेच पदांबाबत आम्ही कोणाशीही चर्चा केली नसल्याचेही यावेळी सांगितले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला पाठिंबा असल्याचा पुर्नरुच्चार करत कोण कुठल्या पदासाठी आग्रही आहे या चर्चेची काहीही अर्थ नाही. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याचं लक्ष्य पूर्ण केलं असून एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील तो निर्णय मान्य करणार असल्याचे जाहिर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादीनं जाहिर केले की, भाजपा व त्यांचे नेते जो व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी ठरवतील त्या नेत्याला आम्ही पाठिंबा देऊ असेही यावेळी जाहिर केले.
दरम्यान, अजित पवार बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा गेलेला राष्ट्रीय पातळीवरील पक्षाचा दर्जा लवकरच पुन्हा मिळणार आहे. तसेच दिल्लीच्या निवडणूकीतही राष्ट्रवादीकडून उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहिर केले.
Marathi e-Batmya