अतुल लोंढे यांचे आव्हान, ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेंनी खुलासा करावा

महाविकास आघाडीचे सरकार कट कारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोदे यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, ॲड. असिम सरोदे यांनी दोन गंभीर आरोप केले आहेत. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व दोन आमदारांना मारहाण करण्यात आली. हे दोन्ही आरोप मन सुन्न करणारे आहेत. मविआ सरकार पाडण्यासाठी खास व्यवस्थेत गुवाहाटीच्या एका पंचतारांकित हॉटेलात आमदारांना ठेवण्यात आले होते आणि यामागे एक ‘महाशक्ती’ आहे हे जगजाहीर होते. हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एका एअर होस्टेसचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला हा प्रकार सरकारने दीड वर्ष दडपून का ठेवला? महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती समजली पाहिजे, सरकारने याची चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत.

पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, अशा गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर सत्तेत वाटेकरी आहे. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा जो प्रकार झाला त्या पापात भारतीय जनता पक्षही तेवढाच वाटेकरी आहे म्हणून भाजपाने गुवाहाटी हॉटेलमधील प्रकरणावर खुलासा करण्याची हिम्मत दाखवावी, केवळ बेटी बचाओ, महिला सक्षमीकरणाच्या पोकळ गप्पा मारू नयेत, असा टोलाही लगावला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *