श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारित पंढरपूर नगरपालिका हद्दीतील यमाई तलाव परिसरात गोशाळा कार्यरत आहे. या गोशाळेच्या विस्तारासह त्या ठिकाणी पिकनिक स्पॉट विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले.
मंदिर समितीने गोशाळेला लागून असलेली अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यासंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रत्यक्ष तर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज ऑनलाईन उपस्थित होते.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारीतील गोशाळेत सध्या सुमारे २२५ लहान-मोठ्या गौर जातीच्या गायी आहेत. या गोशाळेतील गाईंच्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या नित्योपचार व महानैवेद्यासाठी केला जातो. गायींसाठी आवश्यक चारा, पशुखाद्य तसेच इतर सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि, विद्यमान गोशाळेसाठी जागा अपुरी पडत असल्याने गोशाळा विस्ताराची आवश्यकता निर्माण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मंदिर समितीमार्फत पंढरपूर येथील गट क्रमांक १६१ मधील ३ हेक्टर १२ आर क्षेत्राची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित क्षेत्रापैकी सध्या गोशाळेसाठी वापरात असलेल्या मोकळ्या १.२० हेक्टर क्षेत्र आरक्षणातून वगळण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी. तसेच गोशाळेचा विस्तार करताना त्या परिसरात भाविकांसाठी आकर्षक व उपयुक्त पिकनिक स्पॉट विकसित करण्याचाही समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत दिले.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती जागेबद्दल १५ दिवसात अहवाल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अखत्यारीतील गोशाळेचा विस्तार करण्यासाठी यमाई तलावाजवळ आवश्यक असलेली जमीन मंदिर समितीच्या नावे करण्याबाबतचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत, या जमिनीबाबतचा नवीन आणि सुधारीत प्रस्ताव १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
बैठकीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, भास्कर गिरीबाबा, माधवी निगडे, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या १२ हेक्टर जागेवर सध्या गोशाळा कार्यरत आहे. वाढत्या गरजा लक्षात घेता, मंदिर समितीने अतिरिक्त ३.१२ हेक्टर जागेची मागणी केली होती. यासाठी २००८ आणि २०२२ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र, सदर जमिनीच्या आरक्षणाबाबतच्या तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. जमिनीच्या मूळ आरक्षणात पिकनीक स्पॉट आणि टँक डेव्हलपमेंट आदी काही तांत्रिक त्रुटींमुळे ही जागा देता येत नव्हती.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या तांत्रिक वादात न अडकता, विकासाला प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, जुन्या आरक्षणाच्या वादात वेळ वाया घालवण्यापेक्षा, ‘पिकनीक स्पॉट’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने सुधारीत प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव पुढील १५ दिवसांत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर करावा. यामुळे गोशाळेचा विस्तार होऊन भक्तांसाठी आणि गोवंशासाठी सोयीसुविधांचा दर्जा उंचावण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.