मुख्यमंत्री फडणवीस यांची भावुक, ‘मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो’ शोकप्रस्तावा दरम्यान व्यक्त केली भावना

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील सुभाषिताचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो; पण मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांच्या निधनाने हीच वेळ माझ्यावर आली आहे. हे केवळ राजकीय नुकसान नाही, तर अंत:करणाला वेदना देणारी घटना आहे.”

“सभागृहात बाजूची खुर्ची रिकामी…”

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आज बोलणं कुठून सुरू करावं असा प्रश्न पडतो आहे. मनात प्रचंड वादळ आहे. अधिवेशनात सहज नजर वळली की बाजूला दादा दिसायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत कितीही उशीर झाला तरी ते आपल्या जागेवर असायचे. आज ती खुर्ची रिकामी आहे, ही खंत असह्य आहे,” अशी भावनाही यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा अजित पवार यांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता आणि पुढील वर्षी तेरावा अर्थसंकल्प सादर करून विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचले असते. “अचानक त्यांच्या जाण्याने अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली,” असे नमूद केले.

कठोर निर्णयांची धडाडी

अजितदादांच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कठोर निर्णय घ्यायचे असतील तर मागेपुढे न पाहणारे ते होते. वित्त विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक भाराबाबत पुनर्विचार सुचवला तेव्हाही त्यांनी ठाम भूमिका घेत मंत्रिमंडळात विषय मांडला.”

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यानंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली आणि सहकाऱ्यांनाही ते घालायला लावले, अशी आठवणही सांगितली. “या साऱ्या गोष्टी आता आठवणीत राहिल्या आहेत,” असे ते म्हणाले.

“पोकळी म्हणजे काय, ते आता उमगले”

राजकीय पोकळीच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपण अनेकदा पोकळी निर्माण झाली असे म्हणतो. पण अजितदादांसारखा नेता, ज्याने स्वतःचे नेतृत्व निर्माण केले, अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली, असा व्यक्ती निघून जातो तेव्हा पोकळी म्हणजे काय, याची खरी जाणीव होते.”

शोकप्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी असली तरी “माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे,” असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण समाप्त केले. सभागृहातील सदस्यांनीही या वेळी दु:ख व्यक्त करत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *