एप्रिलचा पूर्ण पगार मिळणार, मार्चचा अर्धा पगार गणपतीत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
कोव्हीड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.
महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन माहे मार्च २०२० पासून दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने माहे मार्च २०२० च्या वेतनाचा पहिला टप्पा अदा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात मार्च २०२० च्या उर्वरित वेतनाचा दुसरा टप्पा व एप्रिल २०२० चा पहिला टप्पा प्रदान करण्याचे विचाराधीन होते. तथापि प्रत्येक महिन्यात पंधरा-पंधरा दिवसाची दोन देयके तयार करावी लागल्याने देयके तयार करणारी आस्थापना व कोषागारांचा कामावरचा ताण वाढला असता. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये सध्या १० टक्के एवढ्या कर्मचारी क्षमतेवर सुरू आहेत. काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिन्यात दोन देयके तयार करण्यामुळे वेतन प्रदान करण्यास आणखी विलंब झाला असता, त्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च २०२० चे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील वेतन शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी प्रदान करणे प्रस्तावित असून याबाबत स्वतंत्ररीत्या आदेश निर्गमित करण्यात येतील, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *