धनंजय मुंडेचे मुंबईत १६ कोटीचं घर, तरीही शासकीय बंगला सोडला नाही शासनाने ४२ लाख रूपयांचा दंड ठोठावूनही मुंडे शासकिय बंगल्यातच

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री पदाचा राजीनामा देऊन अनेक महिने झाले तरी त्यांनी शासकीय बंगला अद्याप सोडला नाही. त्यावरून शासनाने त्यांना ४२ लाखाचा दंडही ठोठावला. मुंबईत घर नसल्याने आपण बंगला सोडला नसल्याचे सांगितले मात्र, त्यांचे मुंबईत १६.५ कोटी रुपयांना खरेदी केलेले २१५१ चौरस फुटांचे घर असल्याचे समोर आले आहे. असे असतानाही त्यांनी शासकीय बंगला सोडला नाही यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र राजीनामा देऊन अनेक महिने उलटले असले तरी मुंडे यांनी अद्याप सातपुडा हा शासकीय बंगला सोडला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना आतापर्यंत तब्बल ४२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी मुंडे यांनी मुंबईत घर नाही तसेच आजारपणामुळे मुंबईत राहणे आवश्यक आहे. तसेच मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते. परंतू मुंडे यांच्याकडे मुंबईत स्वतःचे आलिशान घर असल्याचे समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या नावावर मुंबईत गिरगाव चौपाटी येथील एन.एस.पाटकर मार्गावर वीरभवन इमारतीत घर आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नीने हे घर १६ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केले होते. वीरभवन इमारतीत ९ व्या मजल्यावर ९०२असा या घराचा क्रमांक आहे. मुंडेंचे हे घर तब्बल २ हजार १५१ चौरस फुटांचे आहे. तरीही मंत्रिपद गेल्यानंतर देखील मुंडे सरकारी निवासस्थानात राहत आहेत. मुंडे यांनी स्वतः यासाठी १० कोटी रुपये खर्च केला होता. या घरात सध्या कोणीही राहत नाही. ते घर खरेदी केल्यापासूनच बंद आहे,अशी माहिती विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

महायुतीचे सरकार अडीच वर्षानंतर पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत सरकारी बंगला सोडणे बंधनकारक असते. मुंडे यांनी ४ मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण १५ दिवस उलटून गेल्यानंतर त्यांनी मुदतवाढ मागितली पण बंगला सोडला नाही. सातपुडा बंगला ४ हजार ६६७ चौ. फूट आहे. नियमांनुसार मंत्र्यांनी १५ दिवसांत बंगला सोडला नाही, तर प्रति चौ.फूट २०० रुपये दंड आकारला जातो. यामुळे, मुंडे यांना महिन्याला ९ लाख ३३ हजार रुपये दंड लागत असून आता ही रक्कम ४२ लाखांच्या घरात पोहोचली आहे.

या संदर्भात धनंजय मुंडे यांनी विचारता त्यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे. असे सांगितले. तसेच याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे असे ते म्हणाले. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्याचा शासकीय आदेश २३ मे रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्या योग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोध ही सुरु आहे. माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून, तशी शासनाकडे विनंती केली आहे. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *