दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या सणातही चिंता दिसू नये, यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागू होणाऱ्या सर्व सवलतींचा लाभ देण्यासोबतच पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पुण्यातील खराडी येथे व्यंकटेश वनाया या प्रकल्पाच्या भूमिपजन सोहळ्यासाठी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे बोलत होते. ‘शेतकरी हा आमचा अन्नदाता आणि केंद्रबिंदू आहे. त्याला मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारच्या मदतीसोबत केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत आश्वस्त केले असून, केंद्राकडे मदतीसाठी राज्य सरकारने पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दरम्यान, विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायव्यवस्थेविरोधात मोर्चा काढण्याच्या प्रकारावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘संविधानाचा उल्लेख करणाऱ्यांनी संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा सन्मान राखला पाहिजे,’ असा टोला राहुल गांधी यांना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही प्रगती काहींना खटकत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. भारताला बदनाम करण्याचे प्रयत्न जनता हाणून पाडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya