दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी ही मदतदेखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले आहेत की, पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून रब्बी हंगामाचीही शाश्वती राहिलेली नाही. अशा कठीण प्रसंगी राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति शेतकरी ५००० रुपये मदत जाहीर केली आहे. परंतु अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी शासनाने जाहीर केलेली ही दुष्काळी मदत कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय दिवाळीपूर्वी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात यावी अशी मागणी केली.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांना झालेला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी लागू करावी. तसेच, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान अद्याप प्रलंबित असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा करण्यात यावे असे ते म्हणाले.
शेवटी जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या आशेने शासनाच्या निर्णयाकडे पाहत आहे. तरी, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागांना तातडीने आदेश द्यावेत आणि दिवाळीपूर्वी या तिन्ही मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून राज्यातील बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya