हिंमत असेल तर ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळात विरोध करून दाखवा शिवसेनेच्या नौटंकीवर विरोधकाचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी

अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यासंदर्भात सरकारची भूमिका चुकीचीच आहे. हा निर्णय रद्द झालाच पाहिजे. पण शिवसेनेने यासंदर्भात सभागृहात गोंधळ घालून राजदंड उचलणे म्हणजे शुद्ध नौटंकी आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवावा, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी डागली.

तसेच शिवसेनेच्या या नौटंकीला जनता फारशी फसणार नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आमचा तीव्र विरोध आहे. शिवसेनेचीही हीच भूमिका असेल तर ती स्वागतार्हच आहे. परंतु, शिवसेना सरकारमध्ये सहभागी असल्याने त्यांनी या निर्णयाला अगोदर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र विरोध करायला पाहिजे होता. शिवसेनेने मंत्रिमंडळात आपली भूमिका योग्यपणे पार पाडली तर कदाचित त्यासाठी सभागृहात आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. त्यामुळे शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी ही भूमिका मंत्रिमंडळातही आक्रमकतेने मांडली पाहिजे. शिवसेनेने आज या मुद्यावर केवळ सभागृह बंद करायचे, या हेतूने गोंधळ घातला. त्यासाठी थेट राजदंडही उचलला गेला. सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष असतानाही शिवसेनेला सरकारच्या एखाद्या भूमिकेविरोधात एवढी टोकाची भूमिका घ्यावी लागत असेल तर यातून त्यांची प्रामाणिकता नव्हे तर हतबलताच स्पष्ट होते.

तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही शिवसेनेच्या या भूमिकेवर टीका करत राज्याच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात. तिथे काही बोलत नाहीत आणि सभागृहात येवून त्या विषयावर गोंधळ घालतात. त्यामुळे शिवसेनेला अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायद्याला विरोध प्रत्यक्षात करायचा नसून केवळ राजकिय वरचढपणा दाखविण्यासाठी सभागृहात गोंधळ घालायचाय अशी टीका केली.

 

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधान मोदी चांगला कारभार करतायत तर विवेक ओबेरॉय, आर माधवन दुबईत का? मोदींवर चित्रपट काढणारे विवेक ओबेरॉय आणि आर माधवन दुबईचे नागरिक

ज्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट काढला ते अभिनेते विवेक ओबेरॉय आणि दुसरे चित्रपट अभिनेते आर. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *