प्रताप सरनाईक यांची माहिती, एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल घेतली आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले की, “एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे सांगितले.

शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, या मुदतवाढीमुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहनही केले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांचे निर्देश, मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारणीसाठी आराखडा तयार करा मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग

देशातील ऐतिहासिक तंतुवाद्य निर्मिती परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *