विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून घोषणा

नागपूर: प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती नाईक निंबाळकर यांनी आज केली.
सभागृह नेतेपदी देसाई व विरोधी पक्षनेते पदी दरेकर यांची निवड झाल्याबद्दल सभापती नाईक निंबाळकर यांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांना विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर नेऊन बसविले.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल दरेकर यांचे अभिनंदन करताना सभागृह नेते देसाई म्हणाले की, दरेकर यांनी सामाजिक, क्रीडा क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. मुंबईतील सहकार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची मदत होईल.
दरेकर अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना म्हणाले की, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाला मोठी परंपरा आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हे पद सांभाळले आहे. सभागृहाचे कामकाज शांततेत जास्तीत जास्त काळ चालावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. सभागृहात होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून कष्टकरी, कामगार व वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील, विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई गिरकर, भाई जगताप, किरण पावसकर, ॲड. अनिल परब, जयंत पाटील, सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर आदींनीही अभिनंदनपर भाषण केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अंडरवर्ल्डच्या धमक्या व हल्यांमुळे बॉलिवूड प्रचंड दहशतीखाली, बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र साबरमतीच्या जेलमध्ये बसून गुंड चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील तर पोलीस यंत्रणा व भाजपा सरकार काय करते?

मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *