राज ठाकरे यांचा इशारा,… औदार्य महागात पडेल हे विसरू नये ? लिजेंड ऑफ मौला जट सिनेमाला मनसेचा विरोध

काही वर्षापूर्वी भारतातील टीव्ही निर्मात्यांकडून पाकिस्तानी कलाकारांना घेऊन केलेल्या कार्यक्रमाला विरोध करत पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यकाक्रमाला मनसेकडून जाहिर विरोध करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानी कलावंताना भारतीय सिनेमात संधी देत त्यांना भारतीय चित्रपटात स्थान दिल्याप्रकरणीही राज ठाकरे यांच्या मनसेने अनेक चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख यांनी पाकिस्तानी कलावंताचे चित्रपट भारतात का प्रदर्शित केले जात आहेत असा थेट सवाल एक्सवर ट्विट करत केला.

राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे असे आवाहनही यावेळी करत अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की असा इशाराही यावेळी दिला.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका अशी तंबीही यावेळी दिली.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *