काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जेष्ठ नेते व माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे व माजी मंत्री खासदार डॉ. शशी थरूर यांच्यात लढत होत असून येत्या १७ ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पथकाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन पाहणी केली. काँग्रेस पक्षात लोकशाही पद्धतीने अध्यक्षपदाची निवडणूक होत असते. ही निवडणूक निपःक्षपाती होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक प्राधिकरणचे सदस्य तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. पी. सिंग यांनी दिली. राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार असून १९ तारखेला दिल्लीत मतमोजणी करून त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी असलेल्या काँग्रेस पक्षात अनेक वर्षानंतर निवडणुकीने अध्यक्ष निवडला जात असून त्यासाठी देशभरातील काँग्रेस पदाधिकारी या निवडणुकीत आपला नवा अध्यक्ष निवडणार आहेत. या एका पदासाठी काँग्रेसमधून माजी मंत्री व माजी प्रदेश प्रभारी मल्लिकार्जून खर्गे व माजी मंत्री खासदार डॉ. शशी थरूर हे उमेदवार म्हणून उभे आहेत. या दोघांनीही नुकताच महाराष्ट्राचा दौरा करीत आपल्याला मतदान करण्याचे आव्हान केले. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकारी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. पी. सिंग यांनी घेतला. १७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय, टिळक भवन, दादर येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. यावेळी राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावतील. पक्षाच्या या मतदारांना पक्षाने दिलेले ओळखपत्र व आधार कार्ड किंवा फोटो ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. १९ तारखेला दिल्लीत मतमोजणी करून त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे.

निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतून आलेल्या पथकामध्ये केंद्रीय निवडणूक प्राधिकरणचे सदस्य तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. पी. सिंग, प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सहाय्यक प्रदेश निवडणूक अधिकारी दिनेश कुमार, के. एल. पुनिया, नरेंद्र रावत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थ विक्रेत्यांवर १९५ धाडी १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त, १९२ व्यक्तींना अटक

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *