शरद पवार यांचा सवाल, …मग महाराष्ट्रातच चार ते पाच दिवसात निवडणूका का?

देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली आणि दुसऱ्या बाजूने तमिळनाडूमध्ये बघितलं तर तमिळनाडूची निवडणूक एका दिवसात झाली, उत्तर प्रदेशची दोन दिवसांमध्ये झाली, मग महाराष्ट्रातच चार किंवा पाच दिवस का? त्याचे कारण हे आहे, की नरेंद्र मोदी यांना खात्री नाही, त्यांना पुन्हा पुन्हा येता यावं, यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक त्यांनी बदललं आणि आज या पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत असा आरोप केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाही म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला, आणि तो निर्णय तुम्ही मतपेटीद्वारे घ्यावा, याचा अर्थ संसदीय लोकशाही. आज त्याची चिंता सबंध देशात आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या ज्या प्रकारे निवडणुका होत नाहीयेत, तसेच चित्र आपल्याला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. ते येऊ द्यायचं नसेल तर वाटेल ती किंमत देऊ, पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हा निर्णय तुम्हा-आम्हा सर्वांना घ्यायचा आहे, असे आवाहनही यावेळी केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या प्रत्येक भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. देशाचा पंतप्रधान येतो आणि आमच्यावर टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे. कारण त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत पंतप्रधान मोदींना सांगायचंय, राज्यात हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षांपासून फिरत आहे. कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्ष झाली. ५६ वर्षे हा आत्मा शोधतोय की, मोदीसारखी कोणी व्यक्ती आलेली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या. कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले. राजीव गांधी पाहिले. नरसिंह राव पाहिले. अनेकांबरोबर काम केले. यांची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोण तरी एका आत्म्याची चिंता मोदींना वाटते. तो आत्मा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला, या आत्माची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल, यासाठी तो महाराष्ट्रात फिरतो आहे असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

शरद पवार पुढो बोलताना म्हणाले की, ही लोकसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीची आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली की, एकाचवेळी देशाचे मतदान व्हायचे. जास्तीत जास्त दोन दिवसात निवडणूक व्हायची. आज महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यात घेतली आहे. परंतु उत्तर प्रदेशात निवडणूक दोन दिवसात होत आहे. महाराष्ट्रातील पाच दिवस का? कारण की, मोदींना खात्री नाही. त्यांना पुन्हा-पुन्हा येता यावे. यासाठी महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक त्यांनी बदलले. देशातील लोकशाही संकटात आहे. जगात अमेरिका आणि भारत या दोन देशात मोठी लोकशाहीपद्धतीने निवडणुका होतात. अमेरिकेच्या जनतेला देखील भारताच्या निवडणुका, कशा होणार याची चिंता आहे. या निवडणुकीत लोकशाहीच्या पद्धतीने होते की नाही, याबाबत साशंकता लोकांच्या मनात आहे. जगाला सुद्धा देखील चिंता आहे. जगाचा सुद्धा मोदींवर विश्वास आहे का नाही, ही स्थिती आहे असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, वाटले ती किंमत देऊ लोकशाही आम्ही उद्धवस्त होऊ देणार नाही, मोदीला आम्ही जवळून पाहतो. मोदींना आम्ही संसदेत पाहतो. त्यांची मानसिकता आणि समजून घेण्याची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे देशाबाहेर सुद्धा शंकेची स्थिती आहे. त्याची नोंद तुम्ही-आम्ही घेतली पाहिजे. त्यासाठी या निवडणुकीत लोकशाही टिकेल, अशी राजवट या देशात आली पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. मोदींचा यावर विश्वास नसल्याचेही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, शेतीचा प्रश्न काय सोडवले, कांद्याच्या प्रश्नावर बोलायलाच नको. गुजरातच्या कांद्याला निर्यात करायला परवानगी. मग महाराष्ट्राला का नाही, शेतकर्‍यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची असते. काँग्रेस सरकारच्या काळात कांद्याचे भाव वाढले होते. तेव्हा भाजपा विरोधी पक्ष होता. त्यावेळी मी कृषीमंत्री होतो. भाजपा कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेत आंदोलन करत होते. माझ्याविरोधात घोषणाबाजी करत होते. पण मी कांद्यामुळे शेतकर्‍यांना दोन पैसे मिळत असतील, त्याचा भाव खाली येईल, असा कोणताही निर्णय घेण्यास ठाम नकार दिला. सगळ्याच शेतीमध्ये समस्या निर्माण करून ठेवली आहे. याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झाला आहे. भारतात शंभरपैकी ८७ लोकांना नोकरी मिळत नाही. राज्य कशासाठी द्यायची तुम्हाला? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *