समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर टीका केली. “एका प्रधानला हटवून सरकारने प्रधानमंत्र्यांना वाचवले,” असा उपरोधिक टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला.
पेपरफुटीविरोधी दुरुस्ती विधेयकावरील १० तासांच्या चर्चेत सहभागी होताना, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याचा संबंध नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांशी जोडला आणि सरकारला जनतेच्या दबावापुढे झुकावे लागले, असा दावा केला.
अखिलेश यादव पुढे बोलताना म्हणाले की, जेव्हा मंत्री (धर्मेंद्र प्रधान) संसदेत आले, तेव्हा सभागृहाबाहेर त्यांचे स्वागत करण्यात आले. कल्पना करा, सदस्यांना किती मोठा दिलासा मिळाला असेल आणि ते कोणत्या मोठ्या संकटातून वाचले असतील. एका ‘प्रधान’ला हटवून, तुम्ही प्रभावीपणे ‘प्रधानमंत्र्यांना’ वाचवले,” असे सांगितले.
सरकारला कारवाई करण्यास भाग पाडण्याचे श्रेय त्यांनी तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला दिले.
अखिलेश यादव पुढे बोलताना म्हणाले की, मी तरुणांच्या मनोबलाला आणि एकतेला सलाम करतो, ज्यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. सरकारला वाटत होते की ते अजिंक्य आहे, पण तरुणांनी सिद्ध केले की ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए’ (जग झुकते, जर तुम्हाला ते वाकवता आले तर). सरकार नमले आणि त्यांनी मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडले,” असल्याचे सांगितले.
लोकसभा में माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी का संबोधन। https://t.co/LnsIjX7rbb
— Samajwadi Party (@samajwadiparty) July 28, 2026
पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, ही आंदोलने पालकांकडून व्यापक पाठिंबा मिळालेली पहिली विद्यार्थी चळवळ होती आणि त्यांनी ठामपणे सांगितले की, सरकार दबावाखाली आल्यावरच मागण्या मान्य करते. जेव्हा सरकार घाबरते आणि भयभीत होते, तेव्हा ते मागण्या मान्य करते. हे आपण (२०२०-२१ च्या) शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानही पाहिले. निवडणुका जवळ आल्यावर सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्य़ाची आठवणही यावेळी सांगितली.
या आंदोलनांचा संदर्भ देत अखिलेश यादव म्हणाले की, जी गोष्ट सुरुवातीला एक विनोद वाटत होती, ती अखेरीस सरकारला प्रतिसाद देण्यास भाग पाडण्याइतकी महत्त्वपूर्ण चळवळ बनली. मला आशा आहे की तरुणांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य होतील. सरकारने हे ओळखले असेलच की, एक चेष्टेचा विषय म्हणून सुरू झालेला पक्षसुद्धा एक मोठी शक्ती बनू शकतो, असा टोलाही यावेळी लगावला.
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावर भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे नुकसान केल्याचा आरोपही केला.
अखिलेश यादव पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा सत्तेवर आल्यापासून शिक्षण, परीक्षा आणि विद्यापीठांना एकाच रंगात रंगवून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला, म्हणूनच आंदोलने इतकी मोठी झाली की जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नमते घ्यावे लागले. दृष्टिकोन बदलला पाहिजे, असा चिमटाही यावेळी काढला.
अखिलेश यादव यांनी पुढे असा आरोप केला की, सरकारने “भरतीमध्ये दलित आणि मागासलेल्या वर्गांचे हक्क हिसकावून घेतले आहेत आणि उपहासाने म्हटले की, ज्याप्रमाणे केंद्र सरकारने परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे (NTA) सोपवल्या आहेत, त्याचप्रमाणे ते अखेरीस “संपूर्ण सरकारच आउटसोर्स करेल” अशी भीती विरोधी पक्षांना वाटते.
नीट-यूजी २०२६ परीक्षेतील अनियमिततेवरून कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली आठवडाभर चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या काही दिवसांनंतर त्यांनी ही टिप्पणी केली. आंदोलकांनी प्रधान यांना पदावरून हटवणे, पेपरफुटीची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली होती.
पावसाळी अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला.
सोमवारी, सरकारने लोकसभेत पेपरफुटीविरोधी विधेयक सादर केले, ज्याचा उद्देश परीक्षेतील गैरप्रकारांविरुद्धची सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि पेपरफुटीत सामील असलेल्यांना कठोर शिक्षा देणे हा आहे. तथापि, विरोधी सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दिवसासाठी तहकूब करण्यात आले.
Marathi e-Batmya