हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सेवा संकल्प अभियान नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करा; अन्यथा अमित शहांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे केवळ भ्रष्टाचाराच्या हिशोबाचा दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाची राजधानी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी मुंबई आहे. या आर्थिक राजधानीत येऊन महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त ‘मेवा’ कसा लुटता आणि खाता येईल, याची कारस्थाने रचण्यासाठीच अमित शाह यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा असल्याचे दिसत आहे.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटातून जात आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशा परिस्थितीत अमित शाह यांना खरोखरच महाराष्ट्राची आणि शेतकऱ्यांची सेवा करायची असेल, तर त्यांनी ‘मेवा’ लाटण्याच्या राजकारणात न पडता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी. तरच त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला काही अर्थ आहे. अन्यथा हा दौरा केवळ राजकीय नाटक ठरेल असा इशाराही यावेळी दिला.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील जमिनी उद्योगपतींना कशा दिल्या गेल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला, आणखी कोणत्या जमिनी विकायच्या आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेत किती भ्रष्टाचार झाला, याचा हिशोब घेण्यासाठीच अमित शाह महाराष्ट्रात आले आहेत का, असा सवालही उपस्थित केला.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाचा हिशोबही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे. कुंभमेळ्याच्या नावाखाली झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आढावा घेऊन त्यातील पैशांचे वाटप कसे करायचे, याचाच आढावा या दौऱ्यात घेतला जात आहे का? असा खोचक सवालही केला.

हर्षवर्धन सपकाळ बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा करण्याचे कारण पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात हा दौरा भ्रष्टाचाराचा हिशोब करण्यासाठी आणि आगामी काळातील ‘मेवा’चे वाटप निश्चित करण्यासाठी आहे, असा आरोप केला.

संघाचे ‘लिबरल’ रूप हे डुप्लिकेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘लिबरल’ रूप हे डुप्लिकेट आहे. संघाने आपले खरे ध्येय-धोरण नेहमीच लपवून ठेवले आहे. ‘Bunch of Thoughts’ हे संघाच्या विचारसरणीचे महत्त्वाचे पुस्तक मानले जाते; मात्र प्रत्यक्षात आपले हेच तत्त्वज्ञान संघाकडून लपवले जाते. भारताचे संविधान संघाला मान्य नाही, मात्र आम्ही संविधान स्वीकारले आहे, असे दाखवण्याचे नाटक केले जाते. भारताच्या तिरंग्याला विरोध करणारा इतिहास असतानाही आज तिरंगा आमचाच आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते. त्यामुळे संविधान आणि लोकशाही व्यवस्थेबाबत संघाचे प्रेम हे संशयाच्या घेऱ्यात असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विदेशात गेल्यानंतर वेगळी भाषा, देशात वेगळी भूमिका आणि प्रत्यक्ष आचार-विचार-व्यवहारात वेगळाच चेहरा, अशी संघाची आणि भाजपची भूमिका वारंवार उघड झाली आहे. आचार, विचार, व्यवहार आणि उच्चार यामध्येही डुप्लिकेटपणा असल्याचे सातत्याने सिद्ध झाले आहे, असा टोलाही लगावला.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात मुस्लिमविरोधी भूमिका सातत्याने दिसून येते. मग दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहापेक्षा अधिक इस्लामिक देशांचे सर्वोच्च पुरस्कार स्वीकारले आहेत. जर एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांविषयी सद्भावना नाही किंवा त्या धर्माला विरोध आहे, तर मग या इस्लामिक देशांकडून मिळालेले सर्वोच्च पुरस्कार स्वीकारण्याचे कारण काय? हा विरोधाभास नरेंद्र मोदी आणि संघाने स्पष्ट करावा, अशी मागणी केली.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संघाची विचारसरणी, संविधानाबाबतची भूमिका आणि मुस्लिम समाजाबद्दलचा दृष्टिकोन यावर संघाने स्पष्ट भूमिका मांडावी. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी याचा थेट खुलासा करावा, अशी मागणीही केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळांमध्ये आरटीईच्या अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार शाळांमधील पारदर्शकता आणि नियमावलीच्या अंमल बजावणीबाबत वारंवार तक्रारी

महाराष्ट्रातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (RTE) प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *