हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, कर्जत भीमाशंकरचा प्रकल्प उद्योगपतीच्या भल्यासाठी, विकासाला नाही विनाशाला विरोध महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे काय झाले? ते आधी सांगा व नंतर लाखो वृक्ष लागवडीचे बोला

कर्जत भिमाशंकर भागात होणारा टोरंटचा प्रकल्प हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करणारा आहे. विकासाला कोणाचाही विरोध नाही, पण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून कसला विकास करणार आहोत. हा प्रकल्प केवळ उद्योगपतीचे चांगभलं करणारा असून हजारो झाडे दुसरीकडे लावण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हास्यास्पद आहे, असा विनोद राज्याला परडवणारा नसून महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव हल्ली फारच विनोदी झाला आहे, सह्याद्रीच्या भागात लाखो झाडे लावण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता, ही वृक्ष लागवड कुठे केली हे कोणालच माहित नाही, त्यामुळे त्यांचा हा विनोद राज्याच्या पर्यावरणाला आणि लोकांच्या आरोग्याला पेलणारा नाही. वसुंधरा जपली पाहिजे, जंगल संवर्धन झाले पाहिजे. पण राज्यात खाजगी कंपनीचे चांगभलं करण्यासाठी झाडांची कत्तल सुरु आहे. फडणवीस जे बोलत आहेत ती हातचलाखी आहे. झाडे तोडून विकास नको तर शास्वत विकास असावा. या प्रकल्पासाठी राज्यात अनेक जागा आहेत त्याठिकाणी प्रकल्प होऊ शकतो पण त्यांना चौथी, पाचवी मुंबई करायची आहे, त्याची चाचपणी सुरु असल्याचेही यावेळी सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विकासाला कोणाचाच विरोध नाही, विनाशाला विरोध आहे. फडणवीस सरकारच्या काळातच राज्यातील ४० हजार उद्योग बंद पडले, त्याला कोणी विरोध केला नव्हता. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पाला कोणी विरोध केला नव्हता तो गुजरातला का गेला? वाढवण बंदर सुद्धा स्थानिकांच्या अधिकारावर गदा आणणारा प्रकल्प आहे. शक्तीपीठ महामार्गाची कोणी मागणी केली नाही तरीही तो प्रकल्प जबरदस्तीने लादला जात असल्याचा आरोपही यावेळी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या गुरुवार दि. २९ ॲाक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता कर्जत येथे पोहोचून भिमाशंकर अभ्यारणात टोरंट विद्युत प्रकल्पासाठी सुरु असलेल्या वृक्षतोडीची पाहणी करून स्थानिक गावक-यांशी संवाद साधणार आहेत.

विधान परिषद निकाल..

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधान परिषदेच्या पाच जागांचे जे निकाल येतील ते आम्ही स्विकारू. आघाडी म्हणून आम्ही पाच जागा लढलो त्यातील तीन जागांवर मविआचा विजय होईल असे दिसत आहे. नागपूरच्या जागेवरही काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास आहे. या निवडणूकीत पैशांचा खेळ झाला आहे. मोठ्या प्रमाणात भेट वस्तू दिल्या, जेवणावळी झाल्या, लिफाफा, पैठणी देण्यात आल्याचा आरोपही यावेळी केला.

पुर्णेकर हत्येप्रकरणी सरकार कोणाला वाचवत आहे..

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ठाणे हे गुंडांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. ठाण्यातील पुर्णेकर हत्येप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत आहे. एसआयटी स्थापन करून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी तसेच पुर्णेकर कुटुंबाने जे पुरावे व माहिती दिली आहे, त्याआधारावर तपास झाला पाहिजे. पण ज्यांच्यावर आरोप आहेत तेच आरोपींना वाचवत आहेत. देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत, शिंदेंकडून त्यांना काय काढून घ्यायचे आहे, असा सवालही यावेळी केला.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना, शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदारांसोबत बैठकीनंतर केली सूचना

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा लागवड, गोवंश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *