रविवारी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर काही तासांतच, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आरोप केला की, अटकेत असताना त्यांचे फोन २४ तास पोलिसांच्या ताब्यात होते. तसेच, त्यांच्या उपकरणांची (फोन्सची) ‘क्लोनिंग’ केली गेली असावी किंवा त्यात फेरफार केले गेले असावेत, अशी भीतीही व्यक्त केली.
रविवारी दुपारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सौरव दास यांनी सांगितले की, त्यांचे फोन शनिवारी जप्त करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करताना आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया (जसे की जप्तीचा पंचनामा किंवा ‘सीझर मेमो’ तयार करणे) पोलिसांनी पाळली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
सौरव दास पुढे म्हणाले की, आम्हाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उचलून नेण्यात आले आणि आमचे फोन बळजबरीने काढून घेण्यात आले, असा आरोप केला. तसेच, त्या तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
त्यांचे फोन २४ तास ताब्यात ठेवण्यात आले होते, असे सांगत सौरव दास यांनी उपकरणांचे क्लोनिंग किंवा त्यात फेरफार झाल्याची भीती व्यक्त केली.
सीजेपी CJP चे तिन्ही प्रमुख नेते— आशुतोष रांका, सौरव दास आणि अभिजीत दिपके—यांना शनिवारी सकाळी दिल्लीत उतरलेल्या विमानातूनच ताब्यात घेण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात आली; पोलिसांनी सांगितले की, “एक वर्षाच्या कालावधीसाठी शांतता आणि सुवर्तन राखण्याच्या” अटीवर (बंधपत्रावर) त्यांची सुटका करण्यात आली.
याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आशुतोष रांका यांनी आरोप केला की, “प्रत्यक्षात शांतता भंग करण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि अमित शाह करत आहेत.”
आशुतोष रांका यांनी दावा केला की, शनिवार-रविवारी आंदोलनावर घातलेली बंदी आणि आंदोलकांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे “आपल्या देशाची प्रतिमा मलीन झाली आहे.”
पुढे आशुतोष रांका म्हणाले की, “गेल्या दोन दिवसांत हजारो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचे आपण पाहिले आहे. परिस्थिती इतकी गंभीर होती की, काल त्यांनी आम्हाला थेट विमानातूनच ताब्यात घेतले… हा लढा आता कुठे सुरू झाला आहे. हा लढा आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निर्माण केलेल्या युद्धासारखा झाला आहे,” असे सांगत लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.
सौरव दास यांनी सांगितले की, आंदोलकांना जंतर-मंतर येथील निश्चित केलेल्या ठिकाणी आंदोलन करायचे होते. मात्र, त्या ठिकाणाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या किल्ल्याचे स्वरूप दिल्यामुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत आहे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सौरव दास पुढे बोलताना म्हणाले की, “लोकांना निश्चित केलेल्या ठिकाणीच आंदोलन करायचे आहे. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. येथे ४० हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात आहेत; या परिसराचे रूपांतर एखाद्या किल्ल्यात झाले आहे. तुम्ही युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली आहे आणि लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले.
आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत देशभरात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरूच राहील, असे सीजेपी (CJP) नेत्यांनी सांगितले.
आशुतोष रांका म्हणाले की, आम्ही आज पुन्हा एकदा निषेध मोर्चा काढत आहोत आणि राजीनामा मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,” असेही सांगितले.
दोन्ही नेत्यांनी उजव्या विचारसरणीच्या गटांवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आणि भाजपचे सदस्य त्यांना पाठिंबा देत असल्याचा दावाही केला. रविवारी, दिल्लीतील डीडीयू (DDU) मार्गावर काही जणांचा गट तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करताना तसेच महिलांना धक्काबुक्की व मारहाण करताना दिसणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली; हे चौघेही ‘हिंदू रक्षा दल’ या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे सदस्य असल्याचा दावा केला जात आहे.
Marathi e-Batmya