केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण नागरिकांच्या मतांचा अधिकार डावलत सत्तेवर आलेल्यांची सत्ता बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. तसेच मागे पेपर लिक प्रकरणांनी देशाती तरूणांनी आंदोलन केले. त्यावेळी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्रातील सरकारने लगेच घेतला. मात्र देशातील नागरीकांचा मतदानाचा अधिकार चोरणाऱ्या ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा अद्याप मोदी-शाह यांनी घेतला नाही. विशेष म्हणजे ज्ञानेश कुमारच्या विरोधात देशातील तरूणाईने आणि प्रमुख विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारले असतानाही अद्याप राजीनामा घेतला जात नसल्याने ज्ञानेश कुमार याचा राजीनामा का घेतला जात नाही यामागचे कारण आपण लक्षात घेतले पाहिजे असेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना पुन्हा एकदा म्हणाले की, आपली २५ वर्षे भाजपाबरोबरच्या युतीत सडली. आपणही हिंदूत्वाच्या नाऱ्यावर त्यांच्यासोबत जात होतो. मात्र त्याची फळ यांच्याकडून अशा पद्धतीने आपणा सर्व देशवासियांना मिळतील असे माहित नव्हते. त्यामुळे आता या खोड्या हिंदूत्वावाद्यांना सत्तेवरून खेचल्याशिवाय आपणास शांत बसता येणार नाही. त्याचबरोबर या ज्ञानेश कुमार याच्यामुळे देशातील १३ कोटी जनतेला मतदानाच्या अधिकारापासून लांब रहावे लागत आहे. मतदारांच्या नकाशातून या १३ कोटी मतदारांना एकदम गायब केले आहेत. या देशात रहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल अशी घोषणा आपणही कधी काळी देत होतो. परंतु आता त्या १३ कोटीतील असा कोणीच नाही का जो वंदे मातरमची घोषणा देऊ शकणार नाही. मला तर वाटत नाही असे सांगत मतचोरीवरून भाजपाला अप्रत्यक्ष टोला लागवला.
UddhavSaheb Thackeray #LIVE | दसरा मेळावा २०२६ | शिवतीर्थ, दादर https://t.co/PpYkchApUY
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 20, 2026
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील तरूणांनी आंदोलन सुरु केल्यावर मी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी आदल्या दिवशी पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीजार्चमुळे कोणाच्या हाताला इजा झाली होती तर कोणाच्या पायाला इजा झाली होती. तर कोणाच्या डोक्याला इजा झाली होती. त्यावर त्या मुलांना मी म्हणालो की जा घरी इथे कशाला थांबताय, त्यावर त्या मुलांनी सांगितले आता प्राण गेला तरी आम्ही इथून जाणार नाही. आम्हालाही आता बघायचेच आहे असे सांगत या मुलांनी आपला निर्धार बोलून दाखवला. मध्य प्रदेशची एक मुलगी होती. तेथील पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते. पण तरीही ती आंदोलनातून घरी जायला तयार नव्हती असे सांगत या तरूण मुलांमुळेच आता आपल्याला आपले अधिकाराचे रक्षण होईल. या मुलांच्या सोबत उभे राहणे हे आपले काम असल्याचेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मागील वर्षी आपल्याकडे सर्वाधिक पाऊस झाला. त्या पावसात अनेक नदी नाल्यांना पुर आला. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवटून गेल्या. त्यावेळी चार लाख-पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. तर यंदाच्या वर्षी पावसानेच पाठ फिरवली, असे सांगतानाच जो शेतकरी जो स्वतःची काळजी न करता सगळ्यांसाठी कष्ट करतो त्याला त्यांच्या नुकसान भरपाई पोटी सरकार त्याला अवघे पाच हजार रुपये जाहिर करते. त्या पाच हजारात शेतकऱ्यांना काय मिळणार असा सवाल करत ज्या मिंदेसोबतची माणसे सत्ताधाऱ्यांसोबत गेली म्हणून त्यांना खोकी दिली. मात्र शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत अवघे पाच हजार जाहिर केले जातात असे सांगत या सरकारला खाली खेचल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान पदावर असताना निष्कलंक कारभार केला. त्यांच्या विरोधात या भाजपा सरकारने कोणताही पुरावा नसताना खटला दाखल केला. तो खटला आतापर्यंत सुरु राहिला आणि त्यांच्या निधनानंतर तो निर्दोष असल्याचे सांगत संपवला. मात्र ज्याने राम मंदीरात चोरी केल्याचे पुरावे चंपत रायच्या विरोधात असताना त्यास मात्र २४ तासाच्या आत निर्दोष असल्याचे सांगत त्यास निर्दोषही सोडले जात असल्याची टीकाही यावेळी केली. सत्ताधाऱ्यांशी संबधित असलेल्या लोकांवर न्यायालयाचे निकाल तातडीने लागतात. मात्र विरोधकांच्या विरोधातील निकाल मात्र काही लवकर लागत नसल्याचा आरोपही यावेळी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर आपले चमको लगेच भेटायला गेले. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्या हल्लेखोरांना पकडलेही. मग याचं कौतुक करायचं की आणखी काही, टायगर श्रॉपचं सुदैव,तो वाचला. पण गोळी जरा थोडी वर लागली असती तर त्या आरोपींना पकडलं असतं तर काय उपयोग झाला असता असा सवाल करत कोणत्या पद्धतीने सरकार चालवता असा सवाल उपस्थित करत संताप फक्त एका गोष्टीचा येतो की, यांनी स्वतःची धुणी भांडी करायची बाकी ठेवलंय अन्यथा सगळी कामं दिलेली आहेत. आमच्याकडे जरा काही झालं की लगेच पोलिस ठाण्यात बोलवतात मग टायगर श्रॉफवर हल्ला करणारे हल्लेखोर दिसले नाहीत का असा सवाल करत नाकाबंदी वेळी तुमच्या नाकांमध्ये बोळे कोंबले होते का ते हल्लेखोर आले कसे असा सवालही यावेळी उपस्थित केला.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र हे नक्षलवाद्यांच केंद्र बनले म्हणून उच्च न्यायालयात दावा केला. महाराष्ट्रातलं कोणत्या शहरात नक्षलवाद आहे जरा मला सांगा अशी विचारणा करत ते पुढे म्हणाले की, जे गुंड आले होते ते तुमच्या उत्तर प्रदेशा वगैरे तिकडून आलेले. हे तुम्हाला येताना कळलं नाही का त्याच्यावरती तो लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसलाय आणि त्याचे गुंड सांगतात की, आमच्याकडे ७० हजार शूटर्स आहेत. देवेंद्र फडणवीसजी तुमच्यात जर खरंच हिम्मत असेल तर तिकडे साबरमतीला जा आणि तुमचा जो बाप तिकडे दिल्लीत बसलाय त्याच्यासमोर त्या बिश्नोईला खेचून आणा असे आव्हानही यावेळी फडणवीस यांना दिले.
Marathi e-Batmya