एमएमआरडीएकडून मुख्यमंत्री फडणवीस समोर सादरीकरण, मुंबईच्या वाहतूक कोंडी कमी होणार पूर्व-पश्चिम जोडणीसाठी एकात्मिक बोगदा प्रणाली (पाताल लोक) आणि उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा सादर

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास वेगवान आणि अखंड करण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून ते वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली तसेच मुंबई ते वाढवण जोडणी प्रस्थापित करण्यासाठी भाईंदर/उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली (पाताल लोक) तसेच मुंबई-वाढवण द्रुतमार्ग जोडणीसंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी नगर विकास विभागाचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुंबई प्रदेश महानगर विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदि उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या वतीने सादर करण्यात आलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग सुमारे ३१ किलोमीटरचा असून या प्रकल्पामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश व निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी व विमानतळाला थेट जोडणी मिळणार आहे.

मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्ग जोडणीच्या भाईंदर/उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. यासंदर्भात या मार्गाच्या आरेखनाच्या दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

या प्रस्तावित मार्गांमुळे मुंबई महानगरप्रदेशातील प्रस्तावित रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम होणार असून मुंबईतील प्रवास कमीत कमी वेळात होण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

 

About Editor

Check Also

रहेजा कार्लाइन इमारतीला भीषण आग लागून ७ मजल्यांचे नुकसान इमारतीतील ५० रहिवाशांना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश, कोणतीही जीवितहानी नाही

रहेजा गार्डन मधील रहेजा कार्लाइन या १७ मजली इमारतीतील रहिवाशांसाठी कालची दिवाळीची रात्र ही काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *