दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी या विद्यार्थांना दिला.
मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा तुमची बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही पहिली पायरी आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. शासन तुमच्या पाठीशी आहे. फेरपरीक्षेची संधी उपलब्ध असल्याने तिचा लाभ घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
निकालाची वैशिष्ट्ये
या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी ९२.०९ इतकी आहे.
मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक
दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण ८,२०,४२७ मुलांपैकी ७,३४,८१४ मुले (८९.५६ टक्के) तर एकूण ७,२२,०४५ मुलींपैकी ६,८५,६७२ मुली (९४.९६ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.४० ने अधिक आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.६२ टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के, मुंबई- ९४.९७, पुणे- ९४.२४, नाशिक- ९०.५३, अमरावती- ९०.५ ०, नागपूर- ८९.०७ तर लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के लागला आहे.
श्रेणीनिहाय निकाल
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण २७.४१ टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण ३१.२६ टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये २४.६६ टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८.७५ टक्के इतके आहे.
श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७ च्या दहावीच्या परीक्षेस ‘श्रेणीसुधार/ गुणसुधार’ साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
Marathi e-Batmya