भिवडींत शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे (शक्तीपीठ) लोकार्पण झाले. यावेळी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, प.पू. बालयोगी सदानंद बाबा, ह.भ.प डॉ.कैलास महाराज निचिते, राष्ट्रसंत नीलकंठ शिवाचार्य, प.पू. आलोकनाथ महाराज, खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार दौलत दरोडा, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौघुले, शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी, विश्वनाथ पाटील, नरेंद्र पवार, जितेंद्र डाकी, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, अनंता भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास निचिते व राजू चौधरी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराच्या संकल्पना व प्रत्यक्ष निर्माणाकरिता कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपल्या इष्ट देवतेचे मंदिरात जावून दर्शन घेवू शकतो. अतिशय सुंदर, भव्य दिव्य असे हे मंदिर निर्माण करण्यात आले आहे. या मंदिराला सुंदर तटबंदी आहे, अतिशय चांगले बुरुज आहे, दर्शनीय प्रवेश मार्ग, बगीचा आहे. या मंदिराच्या माध्यमातून महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक आणि पुढे संभाजी महाराजांची वाटचाल असे अतिशय सुरेख प्रसंग उभे करण्यात आले आहेत. यातून प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आई जिजाऊंच्या संस्कारांनी अन् आशिर्वादाने शिवबा घडले. त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीतूनच शिवरायांनी मुघलांच्या आव्हानांचा प्रतिकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बलाढ्य फौजेविरुद्ध सर्वसामान्य जनतेतून शक्ती निर्माण केली आणि भगवा झेंडा फडकविला. छत्रपती शिवाजी महाराजांची ३०० वी जन्मशताब्दी साजरी होत असताना देश घडविण्याच्या कार्यात आपले योगदान देवू या, असे आवाहनही केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वर येथे देखील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पानिपत येथील लढाई सर्वांना माहितच आहे. महादजी शिंदे यांनी गाजविलेला पराक्रम सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणीही भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तीपिठाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे भिवंडी-वाडा या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या शक्तीपिठाकडील येणाऱ्या सर्व मार्गांचे नियोजन उत्तमरित्या करावे, येथे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आवश्यक सोयीसुविधा तयार कराव्यात. याकरिता निधीची कमतरता पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

About Editor

Check Also

Mantralay

मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई व नमुने तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती

मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई करण्यात येते. यापूर्वी २६ एप्रिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *