भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, सहायक पोलीस आयुक्त मनोज जोशी, एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सागर पळसुले, परिमंडळाचे सहाय्यक आयुक्त सुहास मनोहर, सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) नीता पाडवी, सहाय्यक पोलीस (वाहतूक) आयुक्त चेतन राठोड, विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत येत असल्याने चैत्यभूमी येथे कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग यांच्यासह सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या सर्व बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहावे. चैत्यभूमी परिसरात वैद्यकीय मदत केंद्रे, आरोग्य तपासणी केंद्रे, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, चैत्यभूमी परिसरासाठी ४, ५ आणि ६ डिसेंबर या तीन दिवसांचा सर्वंकष सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. यासाठी स्थानिक नागरिक, समन्वय समिती आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा. दरवर्षी ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सोयी-सुविधा यावर्षी १ डिसेंबरपासूनच उपलब्ध करून द्याव्यात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी ५ व ६ डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ड्रोन शो आयोजित करावा. ६ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा. बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी वातानुकूलित विशेष बससेवा उपलब्ध करून ती मोफत ठेवण्याबाबत विचार करावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध पुस्तकांचे आणि बार्टीच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारावेत. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती जनजागृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपट तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत प्रस्तावित संविधान मार्गाच्या विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. कीर्ती महाविद्यालयापासून व्हीविंग गॅलरीपर्यंत संविधान मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे. याबरोबरच चैत्यभूमी परिसरातील अभियांत्रिकी व बांधकामविषयक कामे मुंबई महानगरपालिकेने पूर्ण करावीत. तसेच प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने मार्गी लावावा. चैत्यभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शन भरवावे आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाचा विशेषांक प्रकाशित करावा. या विशेषांकाची प्रतसंख्या वाढवून त्यात नामवंत लेखकांचे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट करावेत, अशी सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी यावेळी केली.
Marathi e-Batmya