भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय लोक प्रशासन संस्था प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार विकास विनायक देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक यशवंत बर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टल यासंदर्भात उद्योग संचालनालयाचे उपसंचालक (मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना) नितीन कोळेकर आणि उद्योग संचालनालयातील जीईएम पोर्टलचे तज्ञ कार्यकारी शैलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
शासनाच्या खरेदी धोरणावर नितीन कोळेकर यांनी सखोल मार्गदर्शन शासनासाठी लागू असलेल्या खरेदी नियमावली व धोरण २०१६, खरेदीचे विविध प्रकार, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उद्योजकांसाठी असलेले आरक्षण याबाबतही सविस्तर माहिती दिली. शासनाच्या विभागांतर्गत अंगीकृत उपक्रमांसाठी दर निश्चिती, आरक्षणाची तरतूद, तसेच स्टार्टअप घटकांसाठी देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक योजनांची माहिती त्यांनी स्पष्ट केली.
याशिवाय मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेची भूमिका, महाराष्ट्र शासनाने जीईएम पोर्टल स्वीकारण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि शासनाकडील वस्तू व सेवांची खरेदी जीईएम पोर्टलद्वारे कशी केली जाते, त्यांनी मार्गदर्शन केले. (शासकीय खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता, स्पर्धात्मक दर आणि कार्यक्षमतेसाठी जीईएम पोर्टलचे महत्त्व त्यांनी सांगितले.)
जीईएम पोर्टलचे महत्त्व व कार्यपद्धती
शैलेश जाधव यांनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टलचे महत्व स्पष्ट करताना, शासनाच्या वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी हे पोर्टल का आवश्यक आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. जीईएम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, खरेदीची कार्यपद्धती, निविदा प्रक्रिया, रिव्हर्स ऑक्शन, गुणवत्ता नियंत्रण तसेच पारदर्शक खरेदीसाठी पोर्टलवर असलेल्या महत्त्वाच्या सुविधा त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केल्या.
प्रशिक्षणातून शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या खरेदी नियमावलीची सखोल माहिती मिळाल्याने कार्यपद्धती अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. तसेच GeM पोर्टलचा प्रभावी वापर करून वेळ, खर्च आणि संसाधनांची बचत कशी करता येईल, याचे प्रात्यक्षिक स्वरूपातील मार्गदर्शनही उपस्थितांना देण्यात आले. यावेळी शासकीय खरेदी व निविदा प्रक्रिया विषयीचे आपल्या समस्या, शंकाचे अधिकाऱ्यांनी निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा प्रकारचे क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे शशांक बर्वे यांनी सांगितले
Marathi e-Batmya