मुख्यमंत्री पदाचा शपथ विधीः नवरदेवाचा पत्ता नाही, पण लग्नाच्या वरातीची तयारी जोरात मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात

राज्यात संशयातीत बहुमत मिळवत राज्यात सत्तास्थानी विराजमान होण्यासाठी भाजपा प्रणित महायुतीकडून शपथ विधी सोहळ्यासाठी जोराची तयारी सुरु झाली आहे. त्यातच आझाद मैदानापासून ते शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण हजर राहणार याची एक यादी आणि या सोहल्यासाठी किती लोक हजर राहु शकतील याची यादी भाजपाने तयार केली आहे. मात्र ज्या सोहळ्यासाठी भाजपाकडून तयार करण्यात येत आहे. त्या सोहळ्याचा नवरदेव अर्थात मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीची निवडच भाजपाने अद्याप जाहिर केली नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे.

भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी विविध आमदार आणि आजी-माजी मंत्र्यांची नावे चर्चेत पुढे करण्यात आली. मात्र यातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे सांगत काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात यावरून तर्क वितर्क लढविण्यात येत आहे. कधी महिला आमदाराचे नाव तर कधी दुर्लक्षित आमदाराचे नाव भाजपाकडून चर्चेत ठेवण्यात येत आहे.

त्यातच या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा, राजनाथ सिंह हे खास उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपाचे किमान ५० हजार समर्थक विविध राज्यातील असे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी मोठ्या थाटात करण्यात येणार असला तरी मुख्यमंत्री पदासाठी जो पर्यंत नाव जाहिर होत नाही. तोपर्यंत शपथविधी सोहळ्याला शान येणार नसल्याचे भाजपाकडूनच बोलले जात आहे.
दुसऱ्याबाजूला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा फडणवीस समर्थकांकडून मुद्दाम चालविली जात असल्याचे गडकरी गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र भाजपाच्या धक्कातंत्रानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा देण्यात येणार असल्याची चर्चाही भाजपातंर्गत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामण हे भाजपाचे निरिक्षक म्हणून येत आहेत. त्यांच्या उपस्थितीतच भाजपाचा गटनेता निवडण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भातील ठराव हा अमित शाह, जे पी नड्डा यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर दिल्लीतून मुख्यमंत्री पदासाठीच्या व्यक्तीचे नाव जाहिर होणार आहे. त्यामुळे सध्या अटकळींच्या जीवावर लग्नाची तयारी सुरु आहे. त्यामुळे जून्या एका मऱ्हाठी म्हणीनुसार नवरदेवाचा पत्ता नाही आणि लग्नाची तयारी जोरात सुरु असा प्रत्यय भाजपाची धावपळ बघता सध्या येत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

About Editor

Check Also

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *