मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘चॅटबॅाट’ लोकार्पण व सामंजस्य करार पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम तसेच विविध उद्योग व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय भागीदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून ही डेमोग्राफिक अॅडव्हांटेज देशाच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रभावीपणे काम करत असून उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम ‘महाचतुर चॅटबॉट’ करणार आहे. एआय आधारित ‘चॅटबॉट’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विशेषतः रोजगाराभिमुख युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा चॅटबॉट उपयुक्त ठरणार असून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सेंटर ऑफ एक्सलन्स, आयटीआय आधुनिकीकरण, महिलांचा कौशल्य उपक्रमात सहभाग वाढविणे, तसेच विविध भागीदारींमुळे कौशल्य क्षेत्राला बळ मिळणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आगामी काळात अधिक मोठी झेप घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. “महाचतुर हे नाव जितके सुंदर तितकाच हा उपक्रम दूरदृष्टीचा असून महाराष्ट्राला कौशल्य, रोजगार आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विभागात अनेक अभिनव योजना व उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो संस्था राज्यात कार्यरत असून, त्या सर्वांना एकत्र आणून कौशल्य विकासाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा विभागाचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात काही नोकऱ्यांवर परिणाम होणार असला, तरी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या संधींचे सोने करण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रभावीपणे काम करीत असून महाराष्ट्रातील युवा शक्तीला जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात कुशल, प्रामाणिक आणि सक्षम मनुष्यबळ उपलब्ध असून जगभरातून या मनुष्यबळाला मागणी आहे. या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योगांनाही दर्जेदार मनुष्यबळ मिळेल. राज्यातील आयटीआय, इनोव्हेशन सेंटर्स आणि विविध कौशल्य यंत्रणांचे मोठे नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी विभाग काम करीत असून नावीन्य आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शिकाऊ उमेदवारीसाठी आता ‘महाचतुर एआय चॅटबॉट’; उमेदवारांची नोंदणी होणार फक्त १५ मिनिटांत!

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने शिकाऊ उमेदवारी क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी ‘महाचतुर एआय चॅटबॅाट’ हा (MahaChatur AI) हा नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (एनएपीएस) आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (एमएपीएस) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी योजनेचा लाभ घेताना युवकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शिकाऊ उमेदवारी रोजगाराच्या संधीसाठी भाषिक एआय सहाय्यकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ‘राईट वॉक फाउंडेशन’च्या भागीदारीतून विकसित झालेला हा प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

ही सुविधा युवकांसाठी अत्यंत सोप्या अशा व्हॉटसॲप इंटरफेसद्वारे उपलब्ध असेल. या योजनेसाठी पूर्वी नोंदणीसाठी लागणारे दोन ते तीन दिवस आता केवळ १५ मिनिटांवर आले आहेत. ही प्रणाली संपूर्णपणे शासकीय सर्व्हरवर (Open Source AI) आधारित असून डेटा सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना प्रशिक्षणापासून प्लेसमेंटपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या एआय इंटरफेसमुळे पारदर्शकता वाढणार असून तक्रार निवारण प्रक्रिया अधिक गतिमान होईल. भविष्यात या सुविधेचा विस्तार ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ सारख्या इतर योजनांसाठीही केला जाणार आहे. महाचतुर एआयमुळे युवकांचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल.

विविध ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयपीई ग्लोबल लिमिटेड, नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुंबई, श्रीमद राजचंद्र एज्युकेशनल ट्रस्ट, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट, यूएन-वूमेन यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या. महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण राबविणे, डाटा सुरक्षितता, कैद्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, युवांसाठी कौशल्य उपक्रम राबविणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आदी क्षेत्रात सहकार्य करणार आहेत.

उत्कृष्ट आस्थापना, उद्योग भागीदार व नियोक्ते यांचा सत्कार

टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि., बेंगळुरू, राइटवॉक फाउंडेशन, बजाज ऑटो लि., वाळूज,गती फाउंडेशन ग्लोबल ॲक्सेस टू टँलेट फॉर्म इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा लि., टीएनएस इंडिया फाउंडेशन, लाइटहाऊस कम्युनिटीज, लेंड अ हँड इंडिया यांचा यावेळी उत्कृष्ट आस्थापना, उद्योग भागीदार व नियोक्ते म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जर्मनीसाठी निवड झालेल्या सहा आयटीआय विद्यार्थ्यांचा सत्कार

जर्मनीमध्ये अॅप्रेंटिसशिपसाठी निवड झालेल्या सहा आयटीआय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणेचे प्रशिक्षणार्थी विनायक गणेश तावरे, आदित्य राजाराम जाधव, आशिष राम पसलकर, अथर्व संतोष लोहंगोंकर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबईचे प्रशिक्षणार्थी अद्वैत महेश पाटील, सत्यम अनिल सूर्यवंशी या निवड झालेल्या सहा आयटीआय उमेदवारांना परदेशी अॅप्रेंटिसशिप ऑफर लेटर देण्यात आले.

अॅप्रेंटिसशिप आणि एआय वर पॅनल चर्चा

दुसऱ्या सत्रात ‘इंडस्ट्री लीडरशिप डायलॉग’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत एसबीआय फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्न धर, पुणेचे जबील सर्किटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेंजर आकाश गायकवाड, नाशिकचे फॉक्स सॉल्युशन लिमिटेडचे एचआर प्रल्हाद धुमाळ, अटल स्किल युनिर्व्हसिटीचे पराग अमीन, टाटा स्ट्राईव्हच्या अमिता चव्हाण-पाटील, सीमन्स टेक्नीकल ॲकडमीच्या प्रमुख मनोहन कोरंगा यांनी सहभाग घेतला. जनरेशन इंडिया फॉउडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

‘एआय फॉर पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी’ या विषयांवर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली. उद्योग, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी युवक कौशल्य विकास, उद्योग गरजा आणि एआय वर आधारित सेवा वितरणाच्या नव्या संधींवर चर्चा पार पडली. सिनीअर फेलो सीएसआयएस जयंत कृष्णा, रणकिन एलएलएम एआय च्या संस्थापक कार्तिक शर्मा,एक स्टेप फाउंडेशनच्या आनंद गौतम यांनी चर्चा सत्रात भाग घेतला. या चर्चा सत्राचे समन्वयक समीना बानो यांनी काम पाहिले.

युवा व उद्योग अनुभव कथन

शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दादर प्रशिक्षणार्थी वेदा नरकर, गोदरेज अँड बॉयस आयटीआय मुलुंड प्रशिक्षणार्थी विपुल विलास पांचाळ, फॉक्स सोल्युशन प्रा. लि., नाशिक, एचआर प्रमुख प्रल्हाद धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी केले. आभार व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी मानले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका, डोनाल्ड ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *