हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव प्रदेश काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडवणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

महाराष्ट्र दिनी दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, राजन भोसले, राजेश शर्मा तसेच वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याच्या पुरोगामी वारशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेली ही भूमी, वारकरी संप्रदायाने दिलेली समतेची शिकवण आणि आपल्या मायबोली मराठीचा अभिमान या सर्वांची जपणूक करण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा आजचा दिवस आहे. महाराष्ट्रात समाजात फूट पाडण्याचे, जाती-धर्मांत भांडण लावण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची ओळख आणि अस्मिता कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे महत्त्व कमी करण्याचे कारस्थान सुरु आहे. डी-लिमिटेशनसारख्या प्रक्रियांद्वारे महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा वरवर दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताला धक्का देणारे निर्णय घेतले जात आहेत.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मिसिंग लिंकच्या नावाखाली राजकारण केले जात आहे; पण प्रत्यक्षात कायदा-सुव्यवस्था, प्रशासन, महिलांची सुरक्षा, दुष्काळ व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारविरोधी कारवाई या सगळ्याच ठिकाणी ‘मिसिंग लिंक’ दिसते. सरकारने आत्मपरीक्षण करून ही तूट भरून काढावी.

बच्चू कडू यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बच्चू कडू यांच्या फोन प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. मात्र सत्य समोर आणण्याऐवजी सरकार गप्प बसलेले दिसत आहे.

महाविकास आघाडीतील संबंधांबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आमचे गठबंधन भक्कम आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या भावनेने आम्ही पुढे जात आहोत. आगामी काळात संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस नेतृत्वाची भूमिका बजावेल. राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मोठी शक्ती आहे, आणि राज्यात काँग्रेसला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, ही आमची भूमिका आहे, ज्याला सहयोगी पक्षांनीही मान्यता दिली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा, हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांचे हुतात्म्यांना अभिवादन

महाराष्ट्राच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *