हर्षवर्धन सपकाळ यांचा स्पष्टोक्ती, काँग्रेस मुक्ता कदम आणि डॉ दीपक पवार यांच्या पाठिशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट

भाजपा आणि रा.स्व.संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांना शासकीय यंत्रणेमार्फत दिला जाणारा त्रास हा व्यक्तीस्वातंत्र्याचा वारसा जपणाऱ्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रावर डाग असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत केला.

हर्षवर्धन सपकाळ पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, महानगरपालिका निवडणुक काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडचे सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यामुळेच त्यांना आता नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चूकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. “नांदेडचा राजमहाल हलला” हे खरोखरच यावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपल्या परखड वाणीने मराठी भाषेचा जागर करून मराठी भाषा चळवळ मजबूत करू पाहणाऱ्या प्रा. डॉ. दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये “शहरी नक्षलवादी” असे संबोधून मराठी भाषेच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठी भाषा द्वेषी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच या गोष्ट्री घडवल्या जात आहेत, यात कोणीलाही शंका नसावी असेही यावेळी स्पष्ट केले.

शेवटी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वरील दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत. कॉंग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून मुक्ता कदम व डॉ. दीपक पवार यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशी ग्वाहीही यावेळी दिली.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *