मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला.
काँग्रेस नेते नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन होते आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधे निवेदन द्यायला सुद्धा तयार नाही हे अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोपही यावेळी केला.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. हनी ट्रॅपसारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव या सगळ्यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे ? असा प्रश्न निर्माण होतो. राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचे जीवनमान सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
काल अधिवेशनात मी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला होता. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन… pic.twitter.com/r0XFe0Dxba
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 17, 2025
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, या आधी मी रेशनिंग व्यवस्थेतील भेसळीचा मुद्दा उपस्थित केला होता. गोरगरीब जनतेला दिला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे. याशिवाय रेशनिंग दुकानांवर बसवण्यात आलेली मशीनसुद्धा बोगस असल्याचे दिसून आले आहे. गरिबांच्या तोंडचा घास हिसकावला जात आहे आणि यावर सरकारकडून कोणतीही ठोस माहिती अद्याप देण्यात आलेली नसल्याची आठवणही यावेळी करून दिली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारला निवेदन करण्यास सांगत ही सर्व निवेदने उद्या, शुक्रवारी अधिवेशन संपण्यापूर्वी केले जाईल, असे नाना पटोले यांना आश्वस्त केले.
Marathi e-Batmya