केंद्रा नंतर राज्यातही भाजपाची दांडगाई, विरोधी आमदार समर्थकाला मारहाण भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला मारहाण

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात विशेषतः विधिमंडळात कितीही टोकाची एकमेकांवर टीका केली किंवा शाब्दिक हल्ले चढवले. तरी राज्याच्या राजकारणात शाररीक दृष्ट्या एकमेकांवर हल्ला करण्याचे काम आता पर्यंत कोणत्याही राजकिय पक्षाच्या आमदाराने विधिमंडळाच्या आवारात कधी केले नाही. पण केंद्रातील शासकिय यंत्रणांचा गैरवापर करत इतर राजकिय पक्षातील नेत्यांवर दादागिरी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा कित्ता आता महाराष्ट्रातही भाजपाच्या नेत्यांनीही विधिमंडळातही वापरण्यास सुरुवात केली की काय असा सवाल निर्माण होईल अशी स्थिती भाजपा आमदार आणि समर्थकांनी विधिमंडळाच्या इमारतीत घडवून आणत नवा पायंडा पाडल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन-तीन दिवसांपासून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दीक चकमक उडत होते. या शाब्दिक खटक्यांची परिणीती समर्थकांच्या मारामारीत होईल असेही वाटले नव्हती. पण अशी घटना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी घडवून आणली.

झाले असे की, जितेंद्र आव्हाड हे आज विधानसभेत त्यांची भूमिका मांडल्यानंतर सभागृहाच्या बाहेर मोकळी हवा खाण्यासाठी आलो. त्यावेळी माझ्यावर थेट हल्ला करण्यात आला. ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते असा आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी करत विधानसभेत जर गुंडाना प्रवेश देणार असाल तर आमचे लोक सुरक्षित राहणार नाहीत असा इशारे वजा पोस्टही एक्सवर केली.

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, गुंडगिरी आता विधिमंडळात पोहोचली असल्याचे सांगत या गुंडाना कुणी प्रवेशिका दिल्या, त्यांची नावे उघड केली पाहिजे अशी मागणी करत विधानसभा अध्यक्षांनी मारामारी करणाऱ्या गुंडांवर आणि त्यांच्या पोशिंद्यावर कारवाई करावी, विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. इथे जर अशा प्रकारे मारहाण होत असेल तर विधानभवनाचे महत्व उरले आहे का असा सवाल निर्माण होतो अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

यासंदर्भात विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना कुणी मारहाण केली असा सवाल करत याचा शोध घ्यावा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

तर अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक शेख यांनीही हा मुद्दा उपस्थित करत माझ्यासमोरच मारहाण झाली. विधिमंडळात पुरुषांचा लोंढा इतका वाढला आहे की महिला आमदारांना चालणेही अवघड झाले असल्याचे सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी अतिशय सावध भूमिका व्यक्त करत म्हणाले की, विधिमंडळ परिसर हा विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे त्यांनी यावर कडक भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी मी केलेली आहे. विधिमंडळात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जमतात आणि मारामारी करतात हे योग्य नाही. त्यामुळे या प्रकारावर निश्चितच कारवाई होणार असल्याचे सांगत कारवाईचा चेंडून विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या कोर्टात ढकलला.

दरम्यान या वादाची खरी सुरुवात दोन दिवसापूर्वी झाली, गोपीचंद पडळकर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीचा दरवाजा लागला. त्यावरून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात खुन्नस सुरु झाली. त्यातूनच गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधान भवनातच जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करत चक्क मारहाण केली. त्यावेळी विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत पडळकर यांच्या समर्थकांपासून नितीन देशमुख यांची सुटका केली.

About Editor

Check Also

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *