एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना ‘निपुण सेतू’द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू उपक्रमाच्या धर्तीवर उपक्रम राबविणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अशा उमेदवारांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागामार्फत ‘मैत्री 2.0’ पोर्टल अंतर्गत ‘निपुण सेतू’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ‘प्रतिभा सेतू’ या उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘निपुण सेतू’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारलेल्या अनेक उमेदवारांकडे उच्च शैक्षणिक पात्रता, विश्लेषण क्षमता, नेतृत्वगुण आणि प्रशासकीय कौशल्ये असूनही मर्यादित पदसंख्येमुळे त्यांना संधी मिळत नाही. या गुणवंत मनुष्यबळाचा उपयोग राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेतील मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी यासारख्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, मात्र अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानंतर आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा उपक्रम लागू राहणार असून, मागील एका वर्षातील पात्र उमेदवारांची माहितीही त्यांच्या संमतीनंतर आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास पोर्टलवर समाविष्ट करण्यात येणार आहे.

‘निपुण सेतू’ पोर्टलवर उमेदवारांचे नाव, जन्मवर्ष, शैक्षणिक पात्रता, विशेष प्राविण्य, पूर्वानुभव, संबंधित परीक्षेचे नाव, अंतिम टप्प्यातील गुण तसेच संपर्क तपशील उपलब्ध असतील. मात्र संपर्क माहिती केवळ अधिकृत आणि पडताळणी झालेल्या नियोक्त्यांनाच पाहता येणार आहे.

उमेदवारांची माहिती एमपीएससीच्या अंतिम निकालानंतर सुरक्षित एपीआय प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे पोर्टलवर हस्तांतरित केली जाईल. यासाठी डिजिटल संमती अनिवार्य राहणार असून, उमेदवाराची आयोगाच्या अन्य कोणत्याही परीक्षेत निवड झाल्यानंतर त्याची माहिती पोर्टलवरून आपोआप हटविली जाईल. माहितीची गोपनीयता राखण्यासाठी एन्क्रिप्शन आणि ॲक्सेस कंट्रोलसारख्या तांत्रिक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

शासनाने स्पष्ट केले आहे की, ‘मैत्री’ पोर्टल केवळ समन्वयकाची भूमिका बजावणार असून रोजगाराची कोणतीही कायदेशीर हमी देण्यात येणार नाही. नोकरीचे स्वरूप, वेतन आणि सेवाशर्ती या संबंधित नियोक्ता व उमेदवार यांच्यातील परस्पर करारावर आधारित असतील.

‘मैत्री 2.0’ अंतर्गत ‘निपुण सेतू’ पोर्टल पुढील दोन महिन्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव अथवा प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून विकास आयुक्त (उद्योग) हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती त्रैमासिक आढावा घेऊन पोर्टलच्या प्रभावी वापरासाठी शासकीय व खासगी संस्थांना प्रोत्साहन देणार आहे.

या उपक्रमामुळे एमपीएससीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या हजारो गुणवंत उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असून राज्याला कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 5 जून 2026 रोजी निर्गमित केला आहे.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे आदेश, टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार

टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *