पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे झालेल्या रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेतील लाईटवेट मेन्स डबल स्कल्स प्रकारात सुवर्णपदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकविणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक यशानंतर आता रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) परिसरातील आर्मी रोईंग नोड (ARN) येथे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या स्थळाची उभारणी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक उपकरणे, तांत्रिक व्यवस्था, सुरक्षा, खेळाडूंची निवास व्यवस्था, वाहतूक तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी सुमारे ₹१० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. या खर्चासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते लक्ष आणि उज्वल कुमार सिंह यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दोन्ही मान्यवरांनी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करत आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अण्णा बनसोडे म्हणाले की, सुवर्णपदक विजेते खेळाडूंनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आर्मी रोईंग नोड (ARN) येथे कठोर सराव करून आपल्या यशाची भक्कम पायाभरणी केली आहे. त्यामुळे त्यांचे हे यश केवळ देशासाठीच नव्हे, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठीही अत्यंत अभिमानास्पद आहे.

यावेळी सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या यशामागील कठोर प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिली. तसेच आर्मी रोईंग नोड (ARN) येथे उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधांबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

आगामी रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळाल्यास पिंपरी-चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *