मुंबई: प्रतिनिधी
भिमा कोरेगाव येथील दंगलप्रकरणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत क्लीन चीट दिली. मात्र ही क्लीन चीट दिल्यापासून संभाजी भिडे यांची संघटना आणि त्यांच्या संघटनेच्या धारकऱ्यांचे पुरावे देण्याची लाटच सोशल मिडीयावर आली असून मुख्यमंत्री हा घ्या पुरावा म्हणून व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंला क्लीनचीट देवून जवळपास दोन दिवस झाले. मात्र या दोन दिवसात भिडेच्या विरोधात पुरावे देण्याची चढाओढच लागली आहे. या पुराव्यात व्हाटसअपवर ३० आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी शिवप्रतिष्ठाणचे प्रमुख संभाजी भिडे यांची १ जानेवारी २०१७ रोजी वढू बुद्रुक येथे सभा होणार असल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली. तर याच कालावधीत त्यांच्या संघटनेचे पुणे, औरंगाबाद येथील धारकरी यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचा चुकीचा इतिहास पसरविला जात असल्याने त्या विरोधात समाधी स्थळावर जमा होण्याचे आव्हान करण्यात आल्याचे पोस्टही सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आल्या आहेत.
तसेच भिमा कोरेगांव प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात ज्या अनिता साळवे या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले होते. त्या महिलेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून आपण भिडे आणि एकबोटेच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नसल्याचे स्पष्ट करत तक्रारीत या दोघांनी तेथील त्यांच्या समर्थकांना दलितांच्या विरोधात उचकाविल्याचा आरोप केल्याची बाब स्पष्ट केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजातील एक अँड. स्वाती बाळासाहेब नखाते यांनीही संभाजी भिडे हे दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करतया संभाजी भिडे समर्थनार्थ कोणी जावू नये असे आवाहन समस्त हिंदूना केले आहे. त्याचीही व्हीडीओ क्लीपही व्हाट्सअपच्या माध्यमातून फिरत आहे. त्याचबरोबर इतरही अशा पध्दतीच्या असंख्य पोस्ट सोशल मिडीयावरून व्हायरल होत असून त्याचे प्रमाण सातत्याने सुरुच आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यास क्लीन चीट दिल्याने दलित आणि मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून याप्रकरणातील उपलब्ध झालेले पुरावे ग्राह्य धरून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी या दोन्ही समाजातील नागरीकांकडून करण्यात येत आहे.



Marathi e-Batmya
Thanks for finally talking about >संभाजी भिडेला मुख्यमंत्र्यांची क्लीन चीट आणि सोशल मिडीयावर पुराव्यांची लाट
– Marathi e-Batmya <Loved it!