अमेरिकेचा इराण आणि ओमानला निर्बंधाचा इशारा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण आणि ओमानच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने निर्बंधांची धमकी दिल्यानंतर आणि तीव्र इशारा दिल्यानंतर आखातातील नाजूक शांततेला नवीन तडे गेले. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी या सामरिक जलमार्गात टोल आकारण्यासाठी इराणला मदत करणाऱ्या कोणत्याही देश, कंपनी किंवा व्यक्तीवर निर्बंध लादण्याची धमकी दिली.

स्कॉट बेसेंन्ट यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, “होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये टोल प्रणाली लागू करण्याचा कोणताही प्रयत्न अमेरिकन सरकार सहन करणार नाही,” असे स्पष्ट केले.

स्कॉट बेसेंन्ट यांनी वॉशिंग्टनच्या सर्वात जवळच्या आखाती भागीदारांपैकी एक असलेल्या ओमानला थेट लक्ष्य केले आणि इशारा दिला की, या सामुद्रधुनीतून टोल भरण्यास मदत करण्यात “प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे” सामील असलेल्या कोणालाही अमेरिका “आक्रमकपणे लक्ष्य” करेल.
पुढे बोलताना स्कॉट बेसेंन्ट म्हणाले की, “व्यापाराच्या मुक्त प्रवाहात व्यत्यय आणण्याच्या इराणच्या कोणत्याही प्रयत्नांना सर्व राष्ट्रांनी पूर्णपणे नाकारले पाहिजे, तेहरानचे प्रदेश आणि जगाला दहशत निर्माण करण्याचे दिवस संपले आहेत.” असेही यावेळी सांगितले.

महिन्यांच्या संघर्षानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतरही वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणाव कायम होता.

बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा ताजा इशारा देण्यात आला आहे.
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने प्रसारित केलेल्या वृत्तांनुसार, तेहरान आणि ओमान अशा एका आराखड्यावर चर्चा करत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला, ज्याअंतर्गत दोन्ही देश होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी वाहतुकीवर संयुक्तपणे देखरेख ठेवतील.

“त्यावर कोणीही नियंत्रण ठेवणार नाही,” असे सांगत डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “हे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र आहे आणि ओमान इतर सर्वांप्रमाणेच वागेल, नाहीतर आम्हाला त्यांना उडवून द्यावे लागेल.”

या वक्तव्याने अनेकांना धक्का बसला, कारण ओमानचे अमेरिकेशी पारंपरिकरित्या घनिष्ठ संबंध आहेत. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करण्यापूर्वी वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील थेट चर्चेचे ओमानने स्वागतही केले होते.

व्हाइट हाऊसने नंतर इराणी दूरचित्रवाणीचे वृत्त “पूर्णपणे बनावट” असल्याचे सांगून फेटाळून लावले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हेही पुनरुच्चारित केले की, आंतरराष्ट्रीय नौवहन नियमांनुसार ही सामुद्रधुनी खुली राहील.

“आम्ही त्यावर लक्ष ठेवू, पण त्यावर कोणीही नियंत्रण ठेवणार नाही,” असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
आखातात लष्करी तणाव धुमसत असतानाच हा राजनैतिक वाद समोर आला.

गुरुवारी, दक्षिण इराणमधील बंदर अब्बासजवळ अमेरिकी सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने कुवेतमधील एका अमेरिकी लष्करी तळाला लक्ष्य करून हल्ला केला. वॉशिंग्टनने म्हटले आहे की, यापूर्वीची कारवाई इराणच्या ड्रोन प्रक्षेपण स्थळाला लक्ष्य करून करण्यात आली होती.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, अमेरिकी सैन्याने इराणचे पाच लढाऊ ड्रोन रोखले आणि आणखी एका प्रक्षेपणाची तयारी करत असलेल्या एका कमांड स्टेशनवर हल्ला केला.

कुवेतने नंतर पुष्टी केली की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने देशाच्या दिशेने डागलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखले.

इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने, यापूर्वीच्या हल्ल्यांशी संबंधित असलेल्या अमेरिकन तळाला लक्ष्य केल्याची जबाबदारी नंतर स्वीकारली. अमेरिकेने पुन्हा कोणताही हल्ला केल्यास त्याला “अधिक निर्णायक प्रत्युत्तर” दिले जाईल, असा इशारा इराणी प्रसारमाध्यमांनी दिला.

About Editor

Check Also

कर्नाटकच्या मंत्र्यांनाच सुट्टे पैसे नसल्याने बसमधून खाली उतरण्यास बस कंडक्टरने सांगितले प्रवाशांच्या दैंनदिन अनुभवाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी केलेली अचानक तपासणी (सरप्राईज इन्स्पेक्शन) त्यांच्यासाठीच एक ‘वास्तविकतेची जाणीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *