अजित पवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेच्या बंडखोरीची माहिती आधीच उध्दव ठाकरेंना दिली होती नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेतील बंडखोरीबाबत अजित पवार यांचे विधान

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा भंडाफोड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणखी एका गोष्टीचा गौप्यस्फोट करत शिवसेनेत बंडखोरी होणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिली होती असे मोठे वक्तव्य केले. यापार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या वक्तव्याला महत्व आले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, सहा महिन्यांअगोदरच माझ्या कानावर कुजबूज आली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला. मात्र त्या विश्वासाला तडा गेला. काही जण गाफील राहिले, असेही म्हणाले.
एका माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, बंडखोरी झाल्यानंतर मुभा असल्यासारखे ज्याला जिकडे जायचे तिकडे जा. ज्यांना इकडे थांबायचे असेल तर इकडे थांबा, असे वातावरण पाहायला मिळाले. मात्र वस्तुस्थिती काय याबाबत त्या पक्षाचेच वरिष्ठ जास्त अधिकारवाणीने सांगू शकतील. नेतृत्वाने स्वत:च्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला पूर्ण तडा देण्याचे काम करण्यात आले. काही जण गाफील राहिले, असे म्हणायला हरकत नाही असे स्पष्ट केले.

दीपक केसरकर, दादाजी भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील हे मंत्री वर्षा बंगल्यावर जात होते. चर्चा करत होते. मात्र आमच्या त्या वेळच्या सरकारमधील प्रमुखांनी या गोष्टी का घडू दिल्या, हे समजायला मार्ग नाही. आमच्या सरकारमधील गृहमंत्री, मला, शरद पवार यांना याचा अंदाज आला होता. जे काही चालू होते, ते झाकून राहू शकत नव्हते. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन, कुठे चुकत असेल तर दुरुस्त करणे गरजेचे होते. डोळे झाकू विश्वास टाकला गेला. त्याच विश्वासाला तडा बसला, असेही अजित पवार यांनी सांगितले.

सहा महिन्यांअगोदरच माझ्या कानावर कुजबूज आली होती. माझी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठकांच्या निमित्ताने अनेकवेळा भेट व्हायची. यांना मी याबाबत सांगितले होते. ‘मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून घेतो. आमचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्याही कानावर ते आले आहे. आम्ही त्यातून मार्ग काढतो,’ असे त्यांनी मला सांगितल्याचा खुलासाही अजित पवार यांनी केला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *