नाना पटोले यांचा गौप्यस्फोट, भाजपाच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’… महाराष्ट्र लुटत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार झोपले का? महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का दिला?

भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प व नोकऱ्या हिरावणाऱ्या महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पक्ष युतीला विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

टाटा एअरबस प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उद्घाटन केले, त्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, टाटा एअरबस या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती तसेच या प्रकल्पामुळे १० हजार रोजगार उपलब्ध होणार होते पण हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही. भाजपाचे केंद्रातील सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळे हा मोठा प्रकल्प गुजरातला पळवला. वेदांता फॉक्सकॉन हा १.५० लाख कोटी रुपयांचा प्रकल्पही याच महाराष्ट्रद्रोही लोकांनी महाराष्ट्रात होऊ दिला नाही. भाजपा युती सरकार नोकर भरती करत नाही आणि ज्या प्रकल्पामुळे राज्यातील तरुण मुलामुलींना रोजगार मिळणार होते तो प्रकल्पही गुजरातला पळवला असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतात, त्या फडणविसांनी टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरातमध्ये उद्घाटन झाले आहे हे डोळे उघडे करुन पहावे व महाराष्ट्राला चुकीची माहिती देऊ नये. राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारमुळेच महाराष्ट्राची प्रगती खुंटली असून राज्य पिछाडीवर गेले आहे. ‘मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार’ अशा थापा मात्र आता शिंदे फडणवीसांनी मारू नयेत असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

व्यावसायिक एलपीजीवरील सर्व निर्बंध हटवले घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

पश्चिम आशियातील भू-राजकीय संकटामुळे व्यावसायिक वापराच्या एलपीजी (Packed Non-Domestic LPG) पुरवठ्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *