मुंबईः प्रतिनिधी
देशात राष्ट्राभिमान जागा झाला असताना पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरून प्रश्न उपस्थित करणारे विरोधक पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. अशा विरोधकांच्या राष्ट्रवादाबद्दलच आता प्रश्न निर्माण होतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, मुंबईचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा आणि अहमदनगरचे माजी काँग्रेस नेते ब्रिजलाल सारडा यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, खासदार संजय काकडे, आमदार राज पुरोहित, देवयानी फरांदे व डॉ. राहुल आहेर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्ष आता राष्ट्रवादातही राजकारण आणत आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्यासाठी सैन्याने पराक्रम गाजवला. त्याचे संपूर्ण जगाने समर्थन केले. या बाबतीत संपूर्ण जग भारतासोबत आहे. देशाचा राष्ट्राभिमान जागा झाला आहे. तरीही काही विरोधक सर्जिकल स्ट्राईकबद्दल प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. अशा विरोधकांच्या राष्ट्रवादाबद्दलच आता प्रश्न उपस्थित होतील.
ते म्हणाले की, राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील चांगले नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अभिमानाने उभा असून देशात सामान्य माणसाच्या हिताच्या योजना राबविण्यात येत आहेत. मोदीच देश विकसित करू शकतात, अशी खात्री पटल्याने विविध पक्षांचे नेते भाजपामध्ये दाखल होत आहेत.
त्यांनी सांगितले की, भारती पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. मुंबईत मोठे सामाजिक कार्य करणारे प्रवीण छेडा आज स्वगृही परतले आहेत. नगर जिल्ह्यातील सारडा यांनी दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचे काम केले पण काँग्रेसने तत्व सोडल्यामुळे देशहितासाठी त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आपण या सर्वांचे अभिनंदन करतो.
त्यांनी सांगितले की, खा. संजयनाना काकडे पुण्यातील काही स्थानिक कारणांमुळे नाराज होते. पण त्यांची नाराजी दूर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांना काम करायचे आहे. त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रात भाजपाच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करण्याची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Marathi e-Batmya