हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी हाफकीन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रसाद लाड, संजय खोडके यांनी सहभाग घेतला.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, हाफकीन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी ११०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त ३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकीन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकीन ही देश-विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था; तसेच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत. त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.
शेवटी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, हाफकीनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी व औषधांना देशात विशेष महत्त्व आहे. पोलिओ, घटसर्प; तसेच इतर आवश्यक लसींचे उत्पादन वाढविण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकीन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya