नसीरुद्दीन यांच्या सिनेमात सोनाली होप और हम चित्रपटाद्वारे एकत्र

मुंबई : प्रतिनिधी

आजवर विविध पुरस्कारांना गवसणी घालण्यात यशस्वी ठरलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच फॅार्मात आहे. दिग्दर्शक प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाने नुकताच सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याने सोनाली पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली आहे. अशातच नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या ‘होप और हम’ या हिंदी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रकाशित झाल्याने सगळीकडे सोनालीचीच चर्चा रंगू लागली आहे.

नसीरुद्दीन शाह यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘होप और हम’ या सिनेमात सोनालीही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सुदिप बंद्योपाध्याय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘होप और हम’चं पहिलं पोस्टर नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे. या सिनेमात कबिर साजिद, आमिर बशिर, वीरती वागनानी आणि नवीन कस्तुरीया यांच्याही भूमिका आहेत. ११ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात श्रीवास्तव कुटुंबाची कथा पाहायला मिळेल. नसीरुद्दीन यांनी यात नागेश नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नसीरुद्दीन आणि सोनाली एकत्र आले आहेत. दोन्ही कलाकार आपापल्या ठिकाणी अभिनयात पारंगत असल्याने या सिनेमात दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मानवी भावभावनांची साधीशी गोष्ट या सिनेमात अतिशय खुमासदार शैलीत सादर करण्यात आली आहे. हा सिनेमा जुन्या आणि नव्या पिढीतील संक्रमणाची कहाणी सांगणारा आहे. विविध कल्पनांच्या माध्यमातून तीन पिढ्यांमध्ये झालेले बदल या सिनेमात अधोरेखित करण्यात आले आहेत. पीव्हीआर पिक्चर्सची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती थम्बनेल पिक्चर्स या बॅनरखाली करण्यात आली आहे. रवी के. चंद्रन या सिनेमाचे छायालेखक आहेत, तर शिवकुमार पनिस्कर यांनी संकलन केलं आहे. गीतलेखन सौरभ एच. दीक्षित यांचं असून रुपर्ट फर्नांडीस यांनी संगीत आणि पार्श्वसंगीतही दिलं आहे. ‘होप और हम’मधील सोनालीची ही फॅमिली बॅाक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होते ते पाहायचं आहे.

About Editor

Check Also

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने नवी नियमावली

नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने   सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून नियमावलीचा मसूदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *