मुंबईः प्रतिनिधी
जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला मागे टाकत चीन सर्वात श्रीमंत देश बनला आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदाचा मागोवा घेणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार मॅकिन्से अँड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार, गेल्या २० वर्षांत जगातील संपत्ती तीन पटीने वाढली आहे. पण या वाढीमध्ये चीनचा वाटा एक तृतीयांश म्हणजे सुमारे ३३ टक्के आहे. म्हणजेच चीनच्या संपत्तीत तब्बल १६ पट वाढ झाली आहे.
जागतिक महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेची पिछेहाट होताना दिसत आहे. चीनने अमेरिकेला मागे टाकत सर्वात श्रीमंत देश होण्याचा मान पटकावला आहे. चीनने मागील काही वर्षात मोठी आर्थिक प्रगती केली आहे. मॅकिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, २००० साली जगाची एकूण संपत्ती १५६ ट्रिलियन डॉलर होती. दोन दशकांनंतर म्हणजेच २०२० नंतर ही संपत्ती ५१४ ट्रिलियन डॉलर झाली. चीन २००० मध्ये जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. त्याच वेळी चीनची एकूण संपत्ती ७ ट्रिलियन डॉलर होती, जी २०२० मध्ये वेगाने वाढून १२० ट्रिलियन डॉलर झाली आहे.
अमेरिकेची संपत्ती दुप्पट झाली
गेल्या २० वर्षांत अमेरिकेची संपत्ती दुपटीहून अधिक वाढली आहे. २०२० मध्ये अमेरिकेची संपत्ती ९० ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. अमेरिकेतील मालमत्तेच्या किमतीत फारशी वाढ न झाल्यामुळे अमेरिकेची संपत्ती चीनपेक्षा कमी राहिली आणि त्यांनी पहिले स्थान गमावले, असे अहवालास सांगण्यात आले आहे.
संपत्तीचा मोठा हिस्सा मर्यादित लोकांकडे
चीन आणि अमेरिकेच्या संपत्तीचा मोठा हिस्सा काही श्रीमंत लोकांपर्यंतच मर्यादित असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, या दोन देशांमध्ये १० टक्के लोकसंख्येकडे सर्वाधिक संपत्ती आहे. या देशांमध्ये श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये मोठी दरी आहे.
६८ टक्के स्थावर मालमत्ता
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, एकूण जागतिक संपत्तीपैकी ६८ टक्के संपत्ती रिअल इस्टेटच्या रूपात अस्तित्वात आहे. तर उर्वरित संपत्तीमध्ये पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा समावेश आहे.
चीनची संपत्ती भारताच्या ८ पटीने जास्त
भारताची एकूण संपत्ती ऑक्टोबर २०१९ मध्ये १२.६ ट्रिलियन डॉलर होती. भारताची संपत्ती चीनच्या १२० ट्रिलियन डॉलरच्या एकूण संपत्तीच्या ८ पट कमी आहे. तथापि, २०१९ पासून भारताच्या निव्वळ संपत्तीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
Marathi e-Batmya