मुंबईः प्रतिनिधी
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सप्टेंबर तिमाहीत ७,६२७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ६६.७३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बँकेला ४,५७४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. निकालानंतर बँकेच्या शेअर्सचा भाव ३ टक्क्यांनी वाढून ५३२ रुपयांवर गेला. बँकेच्या शेअर्सचा भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे एसबीआयचे मार्केट कॅप ४.७७ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
सप्टेंबर तिमाहीत एसबीआयचे उत्पन्न ३.९९ टक्के वाढून ६९,४८१ कोटी रुपये झाले आहे. निव्वळ व्याज उत्पन्न १०.६५ टक्के वाढून रु. ३१,१८४ कोटी झाले आहे जे एका वर्षापूर्वी २८,१८१ कोटी होते. सप्टेंबर तिमाहीपर्यंत एकूण २५.३० लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
सप्टेंबर २०२० पर्यंत एकूण कर्जवाटप २३.८३ लाख कोटी रुपये होते. तिमाही आधारावर म्हणजेच जूनच्या तुलनेत यामध्ये किरकोळ वाढ झाली आहे. बँकेने एकूण कर्जापैकी ९.०४ लाख कोटी रुपये किरकोळ आणि वैयक्तिक कर्ज दिले आहे. तर कॉर्पोरेट कर्जाचा आकडा ७.५६ लाख कोटी रुपये आहे. किरकोळ आणि वैयक्तिक कर्ज वाटप १५.१७ टक्क्याने वाढले आहे. तर कॉर्पोरेट कर्जामध्ये ४ टक्के ने घट झाली आहे.
बँकेने गृहकर्जाच्या स्वरूपात ५.१८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. हे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १०.७४ टक्के जास्त आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत बँकेने गृहकर्जासाठी ४.६८ लाख कोटी रुपये दिले होते. बँकेच्या एकूण कर्जापैकी जवळपास २४ टक्के गृहकर्जाचा वाटा आहे.
बँकेच्या एकूण ठेवी ३८.९ लाख कोटी रुपये आहेत. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत त्यात ९.७७ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी बँकेच्या एकूण ठेवी ३४.७० लाख कोटी रुपये होत्या. चालू आणि बचत खाते (CASA) अंतर्गत बँकेच्या एकूण ठेवी १७.०६ लाख कोटी रुपये होत्या. चालू खात्यातील ठेवींमध्ये १९.२० टक्के वाढ झाली आहे, तर बचत खात्यातील ठेवींमध्ये वार्षिक १०.५५ टक्के वाढ झाली आहे.
बुडीत बुडीत कर्जे म्हणजेच बँकेचा NPA वार्षिक आधारावर १.५३ टक्के ने कमी झाला आहे. त्याचा एकूण निव्वळ एनपीए १.२३ लाख कोटी रुपये होता तर निव्वळ एनपीए ३७,११८ कोटी रुपये होता. टक्केवारीनुसार, सकल NPA ४.९० टक्के तर निव्वळ NPA १.५२ टक्के आहे.
Marathi e-Batmya