अमेरिकेत मुलगा अग्निवेशच्या अचानक झालेल्या निधनानंतर, अब्जाधीश उद्योगपती आणि वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपली ७५% पेक्षा जास्त संपत्ती समाजाला दान करण्याच्या आपल्या जुन्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे.
आपल्या आयुष्यातील ‘सर्वात काळा दिवस’ असे संबोधत अनिल अग्रवाल म्हणाले की, स्कीइंग अपघातात झालेल्या दुखापतींमधून बरे होत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या ४९ वर्षीय मुलाचे निधन झाले. अग्निवेशवर न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात उपचार सुरू होते आणि तो बरा होत आहे, असे कुटुंबाला वाटत होते.
“आम्हाला वाटले होते की सर्वात वाईट काळ निघून गेला आहे. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते,” असे अनिल अग्रवाल यांनी एका अत्यंत भावूक निवेदनात म्हटले, ज्यामध्ये त्यांनी कुटुंबाला हादरवून सोडलेल्या दुःखाचे वर्णन केले. “मुलगा वडिलांच्या आधी जगातून जायला नको.” अशी भावनाही यावेळी व्यक्त केली.
३ जून १९७६ रोजी पाटणा येथे जन्मलेला अग्निवेश एका मध्यमवर्गीय बिहारी कुटुंबात वाढला आणि त्याने एक यशस्वी व्यावसायिक म्हणून प्रवास घडवला. मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्याने धातू व्यवसायातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एक असलेल्या फुजैराह गोल्डची स्थापना केली आणि पुढे हिंदुस्तान झिंकचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
त्याच्या यशाव्यतिरिक्त, अनिल अग्रवाल म्हणाले की, त्यांचा मुलगा साधा, प्रेमळ आणि अत्यंत माणुसकी असलेला होता, जो एक खेळाडू, संगीतकार, नेता आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जात असे.
“माझ्यासाठी तो फक्त माझा मुलगा नव्हता. तो माझा मित्र होता. माझा अभिमान होता. माझे जग होता,” असे अनिल अग्रवाल म्हणाले, आणि ते व त्यांची पत्नी किरण या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
आपल्या संदेशात अनिल अग्रवाल यांनी अधोरेखित केले की, या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या मुलासोबत पाहिलेल्या परोपकारी दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
अनिल अग्रवाल म्हणाले की, “कोणतेही मूल उपाशी झोपणार नाही, कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही, प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहील आणि प्रत्येक तरुण भारतीयाला अर्थपूर्ण काम मिळेल, हे सुनिश्चित करण्याचे स्वप्न आम्ही दोघांनी पाहिले होते. आम्ही कमावलेल्या उत्पन्नापैकी ७५% पेक्षा जास्त रक्कम समाजाला परत देऊ, असे वचन मी अग्नीला दिले होते,” असे सांगितले. तसेच “आज, मी ते वचन पुन्हा देतो आणि आणखी साधे जीवन जगण्याचा संकल्प करतो.”
अनिल अग्रवाल म्हणाले की, त्यांच्या मुलाचा आत्मनिर्भर भारतावर दृढ विश्वास होता आणि आपला देश कोणत्याही बाबतीत कमी का आहे, असा प्रश्न तो अनेकदा विचारत असे. “तो म्हणायचा, ‘बाबा, एक राष्ट्र म्हणून आपल्यात कशाचीही कमतरता नाही. आपण मागे का राहावे?’” अशी आठवण यावेळी करून दिली.
वेदांता ग्रुपच्या संस्थापक अनिल अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, दुःखाच्या या प्रसंगीही, वेदांतामध्ये काम करणाऱ्या हजारो तरुणांकडून कुटुंबाला बळ मिळत आहे, ज्यांना त्यांनी विस्तारित कुटुंब असे संबोधले. “त्याच्यासमोर संपूर्ण आयुष्य होते. अनेक स्वप्ने अजून पूर्ण व्हायची होती,” असे सांगत अनिल अग्रवाल पुढे म्हणाले की, अग्निवेशने प्रेरित केलेल्या कार्यामुळे आणि त्याने स्पर्श केलेल्या जीवनांमुळे तो कायम स्मरणात राहील.
“तुझ्याशिवाय या वाटेवर कसे चालायचे हे मला माहीत नाही,” असे त्यांनी आपल्या मुलाला लिहिलेल्या शेवटच्या संदेशात म्हटले, “पण मी तुझा प्रकाश पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.”
Marathi e-Batmya