मुंबई: प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा उद्या ४ मे पासून सुरु होत आहे. मात्र या तिसऱ्या टप्प्यात वाईन शॉप्स आणि बार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच या काळात दारूबंदी कायदा लागू करण्यात आलेला असून बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देत ही बंदी मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यांना लागू करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले.
लॉकडाऊनची घोषणा जाहीर करण्यात आल्यानंतर यासंदर्भातील जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यातील सर्व वाईन शॉप्स, एकल दुकाने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये कोरोनाबाधीत असलेल्या रेड झोन, ऑरेंज झोनचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता रेड झोन्संना यातून पूर्णता वगळण्यात आल्याचे त्यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये जाहीर केले.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेशातील महानगरपालिका व मालेगाव महानगरपालिका हद्द वगळता इतर सर्व रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एका लेनमधील पाच दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

Marathi e-Batmya