मुंबईः प्रतिनिधी
विविध स्वरूपांच्या आरोपात तथ्य आढळल्याने सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आलेल्या दिलीप सोनवणे नावाच्या सरकारी कर्मचाऱ्याने शुक्रवारी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मंत्रालयात उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. स्टेशनरी, पंखे आदी सरकारी साहित्य विकणे, वारंवार गैरहजर राहणे अशा आरोपांवरून कामगार विभागाच्या विभागीय समितीकडून त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर त्यांना सेवेतून काढून न टाकता सोनवणे यांना सक्तीने सेवानिवृत्त करावे, असा निर्णय झाला. सक्तीने सेवानिवृत्त केल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतनासह इतर फायदे मिळू शकतील. याऊलट त्यांना सेवेतून काढल्यास त्यांच्या कुटुंबियांना काहीही मिळणार नाही. त्यामुळे सहानुभूतीचा विचार करत समितीने हा निर्णय घेतला.
गुरूवारी शासनाने सोनवणे यांना सक्तीने सेवानिवृत्त केले. परंतु हा आदेश सोनवणे यांनी स्वीकारला नाही. शुक्रवारी मंत्रालयात ते आपल्या पत्नी-मुलासह आले. कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला. आपल्याला बढती मिळणार होती. त्यामुळेच आपल्याला सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आल्याचा दावा करत सोनवणे यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आसपासच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस नंतर त्यांना घेऊन बाहेर निघून गेले, असे कळते.
Tags cm fadnavis government employee suicide attempt
Check Also
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …
Marathi e-Batmya